fbpx

कंपनीच्या सीमा भिंतीवर रेखाटली ४८ भारतरत्ने !

पुणे :  पिंपळे जगताप, सणसवाडी(शिरूर) येथे असलेल्या एका कंपनीच्या सीमा भिंतीवर सर्व ४८ भारतरत्नांचे चेहरे स्वखर्चाने रेखाटून मधुरे इन्फ्रा इंजिनीअरिंग प्रा.लि. ने भारतरत्न प्राप्त महनीय व्यक्तींना अनोखी मानवंदना दिली आहे ! २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनी या भारतरत्न सन्मान प्राप्त व्यक्तींच्या चेहऱ्यांचे रेखाटन असलेल्या भिंतीचे अनावरण भारतरत्नांच्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होईल.

‘या रेखाटनांचे अनावरण करण्यासाठी आम्ही भारतरत्न प्राप्त व्यक्तींच्या सर्व कुटुंबीयांपैकी प्रतिनिधी म्हणून पंडित भीमसेन जोशी व महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कृतज्ञ भावनेतून आमंत्रित केले आहे ‘, अशी माहिती मधुरे इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रा.लि. तर्फे उमेश विठ्ठल मधुरे,सुनिता उमेश मधुरे यांनी पत्रकाद्वारे दिली.

ज्या कंपनीच्या सीमा भिंतीवर ही भारतरत्ने रेखाटण्यात आली आहेत तिचे नाव ‘जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग इंडिया प्रा.लि. ‘ असे असून तिचे मुख्यालय इंग्लंड मध्ये आहे.पुण्यातील मधुरे इन्फ्रा इंजिनीअरिंग प्रा.लि. ही कंपनी त्यांना प्रकल्प उभारणीच्या सेवा पुरवते. या प्रकल्पात चार चाकी वाहनांसाठी साठी लागणारे टर्बो फॅन बनतात. ‘ जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग इंडिया प्रा.लि. ‘ या कंपनीला मधुरे इन्फ्रा इंजिनीअरिंग प्रा.लि. ने उभारणीचे काम सुरु असताना सीमा भिंतीवर भारतरत्नांचे चेहरे रेखाटण्याची संकल्पना दिली आणि हे काम करण्याची तयारी दाखवली. ‘ जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग’ने त्यांना परवानगी दिल्यावर हे काम सुरु झाले. दोन कलाकारांनी ४८ भारतरत्नांचे चेहरे या भिंतीवर रेखाटले आणि त्यांची माहिती देखील लिहिली.

उमेश विठ्ठल मधुरे,सुनिता उमेश मधुरे म्हणाले,’भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये उज्ज्वल करणाऱ्या काही मोजक्या महनीय व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. त्या सर्व व्यक्तींचा परिचय समाजातील सर्वांना होणे अपेक्षित आहे. या स्तुत्य विचाराने भारताचे सजग नागरिक या नात्याने व सर्व भारतरत्नांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करावा या उद्देशाने कंपनीतील शेडच्या सिमाभिंतीवर सर्व ४८ भारतरत्नांची भित्तीचित्रे हाताने रेखाटली आहेत व त्यांच्या कार्याची संक्षिप्त माहिती लिहीली आहे.

‘भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार या महान पुत्रांना त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या त्यांच्या असिम त्यागाला , समर्पित वृत्तीला , निस्वार्थ भावनेला , ध्येयवेड्या आदर्शाला , त्यांच्या उत्तुंग व उल्लेखनीय कार्याला स्मरुन दिला जातो. या सर्व महान व्यक्तींच्या घरातील सदस्यांचे समर्पण , त्याग , सहन केलेल्या अवहेलना , कष्ट व त्यांची सोबत याची माहिती सर्वाना होणे गरजेची होते . कदाचित कुटुंबातील सदस्यांशिवाय यांचे कार्य तडीस गेले नसते. याच भावनेतून दोन भारतरत्नांच्या कुटुंबियांना प्रातिनिधीक स्वरूपात निमंत्रित केले आहे.

भारतरत्न प्राप्त व्यक्तींच्या कुटुंबियांचा सत्कार :

२६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.झेंडा वंदन ,प्रमुख पाहुणे यांचा आदर सत्कार, सर्व भारतरत्नांची ओळख व माहिती पुर्ण निवेदन, भारतरत्नांच्या कुटुंबियांसोबत भोजन समारंभ अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. भारतरत्ने रेखाटणारे कलाकार आनंद खिरोडकर व सहकाऱ्यांचा सत्कार ‘ जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग ‘कंपनी चे संचालक डायरेक्टर अंकीत हांडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: