fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिंदे – फडणवीस यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली  :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीने दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली. राज्यातील सहकार आणि साखर उदयोग यांच्या सक्षमीकरणासाठी ही भेट घेतल्याचे दोघांनी जाहीर केले आहे. मात्र राज्याच्या राजकारणात लवकरच मोठया राजकीय घडामोडी घडणार असल्याचे हे संकेत असल्याचे मानण्यात येते. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता लवकरच असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्यातील रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार, लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणूका या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असले तरी त्यांच्याकडे सहकार हे खाते देखील आहे. त्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले, ही बैठक केवळ साखर उदयोग आणि सहकार याबाबतच होती. कर्जाचे पुनर्गठण, आयकर विभागाकडील प्रलंबित मुददे, इथेनॉल आदि चार ते पाच महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. साखर उदयोगाच्या अडचणी व त्याचे सशक्तीकरण कसे करता येईल यावर चर्चा झाली. अमित शहांनी सर्वच मुद्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून आठवडाभरातच याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राचा साखर निर्यातीचा कोटा वापरून पूर्ण झाला आहे. मात्र महाराष्ट्राला मोठा सागरकिनारा आहे,बंदरे आहेत त्यामुळे हा कोटा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. त्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तसेच प्राथमिक सहकारी सोसायटी या गावाच्या अर्थकारणात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्या दरम्यानच्या काळात कमजोर झाल्या होत्या.त्यांच्या सक्षमीकरणाची देखील योजना हाती घेण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: