fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

मधुश्री भट्टाचार्य यांच्या सुरेल गायकीने वसंतोत्सवच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात

पुणे : हिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक सरस गीते ‘व्हॉईस ऑफ ए आर रेहमान’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या मधुश्री भट्टाचार्य यांच्या सुरेल आवाजात आज पुणेकर रसिकांनी अनुभविली. याबरोबरच विशाल भारद्वाज यांच्या ‘म्युझिक अँड मोर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली, निमित्त होते १६ व्या वसंतोत्सवचे.

यावर्षी पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात आलेला १६ वा ‘वसंतोत्सव’ म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी संपन्न होत आहे.

यावर्षीच्या महोत्सवात कै. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना मानवंदना देण्यात आली. याबरोबरच विनायक रासकर यांनी डिझाईन केलेलाअजिंठा वेरूळ लेण्यांतील शिल्पांच्या संकल्पनेवर आधारित रंगमंच व्यवस्था हे यावर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना राहुल देशपांडे म्हणाले, “आज वसंतोत्सव ५-७ वर्षांनी पहिल्यासारखा खुल्या मैदानात होत आहे, याचा मला आनंद आहे. गाणं म्हणजे रंगाचा डबा आहे, असे माझे आजोबा पं वसंतराव देशपांडे म्हणायचे. एक शास्त्रीय गायक म्हणून माझ्याकडे किती रंग आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. याच रंगांनी माझ गाणं आणखी समर्पक होतयं असे मी मानतो. एका चौकटीमध्ये संगीताला न पाहता त्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन लॉकडाऊनच्या काळात बदलला. आपण देवाची आराधना करतो तेव्हा सूर पहात नाही. ती हाक मनापासून येणारी असते संगीत असचं आहे, असायला हवं आणि म्हणूनच ते प्रगल्भ होत असे मानतो. याच प्रामाणिक आणि अव्याहत प्रयत्नांनमधून गेली १६ वर्षे महोत्सव सुरू आहे, याचा आनंद आहे. यासाठी रसिक प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.”

महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात मधुश्री यांच्या सादरीकरणाने झाली. रंग दे बसंती या लोकप्रिय चित्रपटात त्यांनी गायलेले ‘ तू बिन बताए…’ या गीताने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. यानंतर जोधा अकबर चित्रपटामधील ‘इन लम्हों के दामन में पाकीज़ा से रिश्ते हैं…’ , शीशा चित्रपटातील राग कलावती मधील ‘यार को मैंने…’, कभी खुशी कभी गम चित्रपटातील ‘ माही वे…’ ही गीते सादर केली.

पुण्यात होणाऱ्या वसंतोत्सवचे कौतुक मी अनेकदा नाना पाटेकर यांच्याकडून ऐकले होते असे सांगत मधुश्री म्हणाल्या, “पुण्यातील रसिक हे संगीताचे चाहते आहेत. असे रसिक असतील तर काही तरी नवीन करायला नेहमीच प्रेरणा मिळते.”

यांनतर त्यांनी युवा या चित्रपटातील ‘ कभी नीम नीम…’ हे गीत प्रस्तुत केले. या गीताच्या रेकॉर्डिंग ची आठवण सांगताना त्या म्हणाले, “या गाण्यासाठी आम्ही सलग १३ दिवस रेकॉर्डिंग करत होतो. अखेर ए आर रेहमान यांच्या मनासारखे रेकॉर्डिंग झाले. पुढे या गाण्याचे मी तमिळ व तेलगू भाषेत रेकॉर्डिंग केले. तेही खूप गाजले.”

‘ये रे घना, ये रे घना… ‘ हे मराठी गीत तर बाहुबली २ मधील ‘ कान्हा सो जा जरा…’ हे भजन, ‘ तुम जो मिल गए हो तो ये लगता है’ , ‘ लग जा गले…’ या गीतांना उपस्थित प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. ‘छाप तिलक…’ या गीताने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.

मधुश्री यांना अनुभव सुमंत (गायन व संवादिनी साथ), प्रथमेश साळुंखे (बासरी), शराफत (तबला व पर्कशन्स), सव्यासाची (बेस गिटार), मोनोतोष (गिटार), राजा (कि बोर्ड), बिजन (ड्रम्स व ऑक्टोपड) यांनी त्यांना समर्थ साथसंगत केली.

यानंतर विशाल भारद्वाज यांचा ‘म्युझिक अँड मोर’ हा कार्यक्रम सादर झाला. या वेळी त्यांनी या आधी सादर न केलेल्या ‘ये जमाना क्यों है…’, ‘मास्क के पीछे…’ या अप्रकाशित रचना प्रस्तुत केल्या. त्यांनी सादर केलेल्या ‘दिल तो बच्चा है जी’, ‘पहली-पहली बार मोहब्बत कि है…’ या लोकप्रिय गीतांना रसिकांची वाह वाह मिळाली.

कार्यक्रमावेळी विशाल भारद्वाज यांनी राहुल देशपांडे यांना स्वत: निमंत्रण देत स्टेजवर बोलावले. या नंतर या दोघांनी एकत्रितपणे सादर केलेल्या ‘पानी पानी रे…’ या गीताला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्नेहल दामले यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचलन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading