fbpx
Thursday, May 16, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे.

येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर होणाऱ्या चित्ररथाविषयी पत्रकार परिषद झाली. यावर्षी महाराष्ट्रासह १७ राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे १० असे २७ चित्ररथ कर्तव्यपथावर दिसणार आहेत.

असा असेल महाराष्ट्राचा चित्ररथ

महाराष्ट्राचे यापूर्वी ४० चित्ररथ सहभागी झाले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सहभागी होणार आहे. या माध्यमातून नारी शक्ति राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्श‍ित केला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

महाराष्ट्र संताची आणि देवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात महत्त्वाची साडेतीन शक्त‍िप‍ीठे आहेत. कोल्हापूरची आंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे आहेत. तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्धे शक्त‍िपीठ आहे. या शक्तिपीठांना स्त्री शक्त‍िचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे.

चित्ररथाच्या पुढील दर्शनिय भागास गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली आहे. समोरील डाव्या व उजव्या भागास पांरपारिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा आहे. त्यांच्यामागे फिरते मंदिर राहील. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींच्या प्रतिमा आहेत.  यामागे पोतराज आणि हलगी वादकांच्या दोन प्रतिकृती असतील. त्यांच्या समोरील भागात लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करणार आहेत. चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा दिसणार आहे. अशी माहिती श्री चवरे यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा सांगणारे “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” हे गीत असेल. यासोबतच कर्तव्यपथावरून सरकणाऱ्या  चित्ररथासोबत डावी व उजवीकडे कलाकार नृत्य सादर करतील. या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे.

आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले. महाराष्ट्राने धनगरी नृत्य या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश या राज्यास मिळाला तर तृतीय क्रमांक झारखंडला मिळाला. या स्पर्धेत एकूण पंधरा संघ सहभागी झाले होते.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, यावर्षी या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील व्हिजनरी परफॉरमिंग आर्ट्स या लोककला समूहाने धनगरी लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण २४ कलाकारांनी भाग घेतला. कलाकारांच्या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी अभिनंदन केले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेनंतर विजेत्या राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading