Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

स्वातंत्र्याच्या महानाटयातून उलगडली भारताच्या वैभवशाली इतिहासाची अमृतगाथा

पुणे : प्राचीन भारतातील चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी यांसारख्या महापुरुषांचे कार्य महानाटयाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर उलगडले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्राचीन भारतापासून ते अगदी आजपर्यंतच्या भारताचा वैभवशाली इतिहास ‘स्वातंत्र्याची अमृतगाथा’ या महानाटयातून पुण्यात तब्बल ११०० विद्यार्थ्यांनी एकाच रंगमंचावर सादर केला.
शि.प्र.मंडळीच्या एस.पी.एम.इंग्लिश स्कूल सदाशिव पेठ तर्फे स्वातंत्र्याची अमृतगाथा या महानाटयाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या हॉकीच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका वीणा देव, अभिनेता विराजस कुलकर्णी, रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, शि.प्र.मंडळीचे उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, सुधीर काळकर, सतिश पवार, नियामक मंडळ सदस्य पराग ठाकूर, सुनील जोशी, राजेश पटवर्धन, शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

सलग २ तास १५ मिनिटांचे हे महानाटय असून भारताचा इतिहास व संस्कृती यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभविली. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे कार्य देखील नाटकातून उलगडण्यात आले. तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर महिला सबलीकरण, हरितक्रांती, उद्योगधंद्यांचा विकास, अण्वस्त्र चाचणी, इस्त्रो, भारतीय सैन्य यापासून ते भारतीय अध्यात्म असे अनेक आयाम हे नाटयप्रसंगातून सादर झाले.

एस.पी.एम.इंग्लिश स्कूलच्या बालवाडी ते ९ वी पर्यंतचे ११०० विद्यार्थी व विद्यार्थीनी यामध्ये सहभाग घेतला. महानाट्यामध्ये नांदी, भारुड, बुरगुंडा, पोवाडा, सवालजवाब, मंगळागौरीचे खेळ, धनगरी नृत्य, शेतकरी नृत्य, वारीचे अभंग, बतावणी आदींद्वारे भारतीय लोककलेचे दर्शन देखील झाले. महानाटयाची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांची आहे. माजी नगरसेवक धीरज घाटे यांसह अनेकांनी महानाटयाकरिता विशेष सहकार्य केले. महानाटयाचे लेखन व दिग्दर्शन मिनाक्षी दाबके यांनी केले असून होनराज मावळे यांनी संगीत दिले आहे. सुधीर अंबी यांनी नेपथ्य केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading