Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

…अन् उघडला ऐतिहासिक शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा

पुणे : ज्या वीरांनी भगवा झेंडा भारत वर्षी नाचवला…सिंधुतिरावर अश्व दौडले कीर्ती भिडली गगनाला… शिवरायांचे स्वप्न उराशी मुक्त करावी मथुरा काशी… हिंदुराष्ट्र हे समर्थ करण्या रिपू रक्ताचा पडे सडा… पराक्रमाची स्फूर्ती देत असे शनवारातील हा वाडा… अशा पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवार वाड्याचा २९१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भव्य रांगोळी…सनई चौघड्यांचे सुर आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे  व नानासाहेब पेशवे यांना अभिवादन करीत शनिवारवाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा देखील यावेळी उघडण्यात आला.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार वाड्याचा २९१ वा वर्धापन दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (नि.), इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, सूर्यकांत पाठक, सचिव कुंदन कुमार साठे, श्रीकांत नगरकर, विद्याधर नारगोलकर, चिंतामणी क्षीरसागर, विश्वनाथ भालेराव, उमेश देशमुख आणि पेशवे कुटुंबीय उपस्थित होते.

मोहन शेटे म्हणाले, शनिवार वाड्याची वास्तू म्हणजे केवळ दगड धोंडे नाहीत. २५० वर्षांचा मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर आहे. कितीतरी विजयाच्या वार्ता या शनिवार वाड्यावर आल्या. बाजीराव पेशवे यांनी पुण्याला राजधानी करण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यात वैभव संपन्न आणि देखणा शनिवार वाडा बांधला. त्यावेळी केवळ पुण्यात किंवा भारतातच नाही तर आशियातील उत्तम दर्जाचा हा वाडा होता. परंतु या वाड्याचा उपभोग घेण्यासाठी बाजीराव पेशवे येथे थांबले नाहीत. ते सतत रणांगणावर लढले, ही देखील अभिमानाची गोष्ट आहे.

मराठ्यांचा इतिहास माहीत होण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याची गरज आहे अशी भावना भूषण गोखले यांनी यावेळी व्यक्त केली. कुंदनकुमार साठे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading