Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

वृद्धांची आई होऊन सेवा करतेय : गौरी धुमाळ

पुणे : सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळत नाही. बँक खात्यात झिरो बॅलन्स असताना, लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन एकल वृद्धांसाठी कार्य सुरू केले. समाजाच्या मदतीशिवाय मी एकटी कुठलेही कार्य करू शकत नाही याची जाणीव होती. माझ्या कार्याची माहिती जसजशी लोकांना होत गेली तसतसे मदतीचे हात पुढे आले. त्यातून उमेद वाढत गेली. वयाने लहान असले तरी आईच्या मायेने वृद्धांची सेवा करीत आहे, असे प्रांजळ मत अकोले (पौड गाव) येथील स्वामी निवास वृद्धाश्रमाच्या संचालिका गौरी धुमाळ यांनी व्यक्त केले.
करम प्रतिष्ठान आणि रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ‘एकल वृद्धांच्या समस्या’ या विषयावर गौरी धुमाळ यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे रविवारी (दि. 22) पत्रकार भवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्यांनी आपला हा वेगळ्या वाटेवरील प्रवास उलगडला. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि प्रा. प्रज्ञा महाजन यांनी त्यांच्याशी संवाद साधला. करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर व्यासपीठावर होत्या. सुरुवातीस धुमाळ यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आनंदी केअर सेंटरच्या अध्यक्षा रोहिणी ताकवले यांचाही या प्रसंगी उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
वृद्ध एकटे आहेत की एकटे पाडले गेले आहेत हे पाहणे आवश्यक असल्याचे सांगून धुमाळ म्हणाल्या, जो अडचणीत मदत करतो, इतरांच्या समस्या समजून घेतो तो खरा नातेवाईक; पण आज कुणाला चौकटीबाहेर पडायचे, मदतीसाठी पुढे यायचे नाही अशी परिस्थिती आहे. एकल वृद्धांच्या शारीरिक समस्या खूप असतात त्याविषयी उपाययोजना करणे आवश्यक असते. मानसिक ताणामुळे थकवा येतो. तणावाच्या परिस्थितीत वृद्धांशी संवाद साधायला कुणी तयार नसते.
वृद्धांच्या समस्या जेव्हा समजत गेल्या तेव्हा या प्रश्नात भावनिकदृष्ट्या अडकत गेले. स्वत:च्या पदरचे पैसे घालून वृद्धांसाठी निवारा उभा केला. पैसा कसा उभारावा याची माहिती नव्हती. डॉ. अभिजित सोनवणे यांच्याविषयी ऐकले होते. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर मार्ग सापडत गेला, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पुण्यातील एका वृद्ध जोडप्यावर उद्भवलेला प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, या जोडप्याची शारीरिक स्थिती अत्यंत वाईट होती. मुलबाळ नसल्याने त्यांच्या इतर नात्यातील कुणी मदतीसाठी पुढे येत नव्हते. या जोडप्याला आम्ही आमच्या वृद्धाश्रमात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा संमतीपत्रावर सही करण्यासही कुणी तयार होत नव्हते. पोलिसांच्या मदतीने हा प्रश्न सुटला. वृद्धापकाळामुळे महिलेची तब्येत बिघडली तेव्हा त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. उपचारासाठी साठ हजार रुपये व्याजाने घ्यावे लागते. ही माहिती जेव्हा सुहृदांना कळली तेव्हा त्यांनी ओळख नसतानाही पैशांची मदत केली.
एकेकाळी वृद्धाश्रम पूर्णपणे बंद व्हावेत असे वाटायचे पण वृद्धांच्या समस्या ऐकल्यानंतर वाटते असे वृद्धाश्रम आहेत म्हणून ही माणसे जगू तरी शकत आहेत, अशी टिप्पणही त्यांनी केली. वृद्धांसाठी कार्य करीत असताना आलेल्या चांगल्या-वाईट आठवणीही त्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक भूषण कटककर यांनी केले. मानपत्राचे वाचन वैशाली मर्ढेकर, मुक्ता भुजबले यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात करम ‘आभा’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात कांचन सावंत, मिलिंद छत्रे, सुजाता पवार, प्राजक्ता पटवर्धन, चंचल काळे, स्वाती यादव, वासंती वैद्य, वैजयंती विंझे-आपटे, डॉ. दाक्षायणी पंडित, अपर्णा डोळे, प्रतिभा पवार, वैशाली माळी यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading