नीलाद्री कुमारच्या सतारवादनाने १६ व्या वसंतोत्सवचा समारोप
पुणे : सायंकाळची उत्तरोत्तर वाढणारी थंडी आणि नीलाद्री कुमारच्या सतारीच्या सुरावटीनी १६ व्या वसंतोत्सवचा आज समारोप झाला.
नीलाद्री यांनी आज राग कौशी कानडाचे बहारदार सादरीकरण केले. त्यांना पद्मश्री पंडीत विजय घाटे यांनी समर्पक तबलासाथ केली. नीलाद्री यांनी सादर केलेल्या बंदिशी व विलंबित तीनताल, द्रुत तीनतालच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
पुण्यासारखा रसिक प्रेक्षक जगात कुठेही नाही असे आवर्जून नमूद करीत नीलाद्री यांनी रसिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भैरवीच्या वादनाने नीलाद्री यांनी आपल्या सादरीकरणाचा व १६ व्या महोत्सवाचा समारोप केला.
