fbpx

नव्या विषाणूची व्याप्ती अधिक परंतु तीव्रता कमी असेल : डॉ. धनंजय केळकर

पुणे : कोव्हिड या विषाणूवर अद्याप एकही औषध निर्माण झालेले नाही. लसीकरण, खबरदारी बाळगणे, प्रतिकारशक्ती वाढविणे त्यासाठी नियमित व्यायाम करणे, ड जीवनसत्वाचे सेवन करणे, शक्य असल्यास जलनेतीचा आधार घेणे या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास कोव्हिडपासून स्वत:ला दूर ठेवू शकतो, असे प्रतिपादन दीनानाथ रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी केले. बी एफ 7 या नव्या विषाणूची व्याप्ती आधीच्या विषाणूपेक्षा अधिक राहणार आहे. परंतु तीव्रता कमी असल्याने मृत्युदर कमी असेल. येणाऱ्या 2023 या वर्षात कोव्हिडचा अंत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सहजीवन व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. 30) डॉ. केळकर यांचे ‘लढा कोरोनाशी आणि कोरोना नंतरची आव्हाने’ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. केळकर यांच्या व्याख्यानाने सहजीवन व्याख्यानमालेचा समारोप झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पंडित अतुलकुमार उपाध्ये, नितीन पाटील व्यासपीठावर होते.

सम्यक दृष्टीकोन ठेवून धैर्यशीलपणे कोव्हिडला समोरे जाणे आवश्यक आहे, कारण कोव्हिडने अजूनही गुडघे टेकलेले नाहीत असे सांगून डॉ. केळकर म्हणाले, आजारपणाचा अपरिहार्य भाग म्हणून कोव्हिडकडे पाहणे आवश्यक आहे. कोव्हिड नाहीच अशी समजूत असणे तसेच अती चिंता या गोष्टी आरोग्यासाठी मारक आहेत.
कोरोनाचा देशात झालेला शिरकाव येथपासून आजपर्यंतच्या कोव्हिडविषयक घटनांचा आढावा घेऊन नव्या विषाणूविषयी टिप्पणी करताना ते म्हणाले, लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती वाढली आहे, परंतु लसीकरण होऊन ठराविक काळ गेला असल्याने ती आगामी काळात संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ज्या व्यक्तींनी अद्याप लसीकरणाचा तिसरा टप्पा पार केलेला नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे. सध्या ज्या बी एफ 7 या विषाणूची चर्चा सुरू आहे त्यावर अद्याप लस आलेली नाही; परंतु नजीकच्या भविष्यकाळात उपलब्ध झाल्यास ती अवश्य घ्या असे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले.
कोणत्याही उपचारपद्धतीवर शंभर टक्के अवलंबून न राहता आरोग्य उत्तम ठेवा, कमीतकमी 40 मिनिटे व्यायाम करा, शक्य असल्यास जलनेती करा कारण याद्वारे श्वसन यंत्रणेला होणारा संसर्ग टळू शकतेो. सर्दी, खोकला, ताप याने बाधित असल्यास मास्कचा जरूर वापर करा. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर जनतेने मोठ्या प्रमाणात लसीकरण करवून घेतले, परंतु कोव्हिडचा जोर ओसरताच जनता मानसिकदृष्ट्या तणावमुक्त झाल्याने तिसरा डोस घेण्यात दुर्लक्ष केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोरोनाकाळात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केलेल्या उपाययोजना-सुविधा यांची त्यांनी माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, सध्याची परिस्थिती बघता परदेशात प्रवास करणे टाळा; कारण देशातील सार्वजनिक आरोग्यसुविधा जितकी सक्षम आहे त्या तुलनेत कोव्हिडबाधीत देशात नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा कुलकर्णी यांनी केले तर आभार विनय (राजू) कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: