fbpx

चित्रांच्या दुनियेत रंगरेषेच्या जादूगारासोबत रमले बालचमू

पुणे : रेषा, गोल आणि विविध आकारांच्या मांडणीतून उमटणारी बोलकी चित्रे काढण्याचे धडे देत बिनभिंतीच्या शाळेत बालचमूंचा तास रंगला. प्रख्यात चित्रकार चारुहास पंडित यांनी कॅनव्हासवर विविध रेषा काढत रेषा आणि आकारांतून निर्माण होणा-या बोलक्या चित्रांची जादू चिमुकल्यांना दाखविली. तर, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी समाजात कशा प्रकारे वावरावे, याचे मार्गदर्शन करीत मुलांसोबत संवाद साधला.

निमित्त होते, अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे सरत्या वर्षाला निरोप देण्याकरीता आणि वेंकीज उद्योग समूहाचे संचालक व्यंकटेश राव यांच्या वाढदिवसानिमित्त सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात आयोजित आनंदमेळावा व स्नेहभोजनाचे. यावेळी खडक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षा संगीता यादव, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, माई देशमुख, शेखर पवार, योगेश निकम, सुधीर साकोरे, विक्रांत कदम, गिरीश पिसाळ, विजय जाधव आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १९ वे वर्ष आहे. वंचित विकास संस्थेतील २०० चिमुकल्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

संस्थेत आलेले पाहुणे चक्क आपल्याला जेवण वाढतायंत हे पाहून थक्क झालेल्या मुलांनी रुचकर जेवणाचा आनंद देखील घेतला. लाखो रुपयांची उधळपट्टी करीत ठिकठिकाणी रंगणा-या नववर्षाच्या पार्टीपेक्षा वंचित मुलांसाठी स्नेहभोजनाचा एक अनोखा उपक्रम राबवित सरत्या वर्षाला निरोप देत मंडई परिसरातील तरुणांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

चारुहास पंडित म्हणाले, रंगरेषा आणि चित्रांतून आपण हास्य पेरण्याचे काम करीत असतो. सरत्या वर्षाला निरोप देताना वंचित मुलांसोबत स्नेहभोजन हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. चित्रकलेसारख्या विविध कलांमधून आपण आपल्या मनातील भाव कागदावर उतरविले पाहिजेत.

राजेंद्र डहाळे म्हणाले, सरत्या वर्षाला निरोप देताना असे विधायक उपक्रम व्हायला हवेत. नवीन वर्षाचे स्वागत करताना देखील सामाजिकता आणि विधायकता आपण आपल्यामध्ये अंगिकारायला हवी. म्हसोबा मंडई ट्रस्टने हा उत्तम उपक्रम राबविला असून यामाध्यमातून मुलांच्या चेह-यावर दिसलेले हास्य सामान्यांना आनंद देणारे आहे.

निवृत्ती जाधव म्हणाले, प्रत्येकाची आनंद साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. परंतु आपण आपल्यासोबत समाजातील गरजू आणि निराधार घटकांचा विचार करायला हवा. सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबतच चांगले संकल्प मनाशी ठेऊन आपण नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे. त्याकरीता दरवर्षी निराधार चिमुकल्यांसोबत आनंदमेळावा स्नेहभोजन करण्याचा उपक्रम राबविण्यात येतो, असेही ते म्हणाले. चिमुकल्यांनी जादूचे प्रयोग व टॅटू मेकिंग चा आनंद लुटला. तसेच मुला-मुलींना भेटवस्तू देण्यात आली. जतीन पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: