fbpx

वैविध्यपूर्ण मंदिरे आणि वैशिष्टयपूर्ण पाषाणातून उलगडले महाराष्ट्रातील मंदिरांचे वास्तुवैभव 

पुणे : सूर्योदयाचे पहिले किरण शिवलिंगावर पडणारे शिखर शिंगणापूर येथील महादेव मंदिर…मशिदीतील दगडावर पाण्याचा गोळा फिरल्यावर दिसणारी कुराणातील अक्षरे… वाशिम शिरपूर मधील अधांतरी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ जी यांची मूर्ती…शिवलिंगावर अभिषेक करतातच सुरू होणारा सिंहनाद….तरंगत्या विटांचे मंदिर अशी महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण आणि रोचक इतिहास असणारी मंदिरे आणि वैशिष्ट्यपूर्ण पाषाण, तरंगणाऱ्या विटा पाहण्याची संधी ‘गाणारे दगड आणि बोलणारे पाषाण’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनातून पुणेकरांना मिळाली.

मंदिर कोश यांच्यावतीने कै. मोरेश्वर कुंटे आणि त्यांच्या पत्नी विजया कुंटे यांनी पाहिलेल्या १८ हजार मंदिरांपैकी काही आगळ्यावेगळ्या मंदिरांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हिजे डेव्हलपर्सचे चेअरमन विलास जावडेकर, मिलिंद तुळाणकर, प्रसन्न जगताप, मंदिर कोशचे प्रभाकर कुंटे, दिलीप प्रधान, प्रियंका कुंटे उपस्थित होते.  

किरणोत्सव आणि खगोलशास्त्र आणि आधुनिक विज्ञान आणि प्राचीन मंदिरे या दृष्टीने मंदिरांचा अभ्यास करून त्याची वैशिष्ट्ये अतिशय नेटक्या पद्धतीने प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मंदिरांचे वास्तुवैभव किती संपन्न आहे, याची प्रचिती येते.

ठाण्यातील ६ हातांचा गणपती… वर्धा पैनगंगा नद्यांच्या संगमावरील सहा हातांची सूर्यमुर्ती… रोहिणीखेडी येथील सोळाव्या शतकातील मशिदीतील दगडावर पाण्याचा गोळा फिरल्यावर दिसणारी कुराणातील अक्षरे…नांदेड जिल्ह्यातील राहोरी येथील श्री  नृसिंह मंदिरातील चकतीवर आघात केल्यास येणारा मंजुळ आवाज अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची माहिती प्रदर्शनात पाहायला मिळते. याशिवाय महाराष्ट्रातील ऋषींची मंदिरे त्यांचा जन्म कर्तृत्व अशी विविध माहिती देखील प्रदर्शन लावण्यात आली आहे. 

बालगंधर्व कलादालनात दिनांक २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान हे छायाचित्र प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत विनामूल्य पाहता येणार आहे. प्रदर्शनात दररोज मंदिरांच्या कथा सांगणारे  मुकुल कुंटे यांचे व्याख्यान संध्याकाळी ५  ते ६  यावेळेत  होणार आहे.

 मोरेश्वर कुंटे आणि विजया मोरेश्वर कुंटे यांनी १८ नोव्हेंबर १९९१ पासून वानप्रस्थाश्रम स्विकारला. यात त्यांनी देवदर्शन घ्यायला सुरुवात केली पण ती वेगळ्या प्रकाराने.  एक-एक जिल्हा ठरवून त्यातील प्रत्येक शहरात, खेडेगावात जाऊन तेथील ऐतिहासिक माहिती, पूजेची पद्धत, सध्याची परिस्थिती याची माहिती घेऊन त्या मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण फोटो घेऊन त्यावर पुस्तक काढले आणि मंदिर कोश रूपाने सादर केले. १९९१ पासून ३३ जिल्ह्यांतील १८ हजाराहून अधिक मंदिरे त्यांचे २५ हजाराहून अधिक फोटो व एम ५० या दुचाकीने १.१५ लाख किलोमीटरचा प्रवास केला असून या  विषयावर ४० पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या या कार्याची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसने दखल घेतली.

Leave a Reply

%d bloggers like this: