fbpx

चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची रविवारपासून

पुणे : समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक लोकशाहीची पताका हाती घेऊन संत चोखोबा अध्यासन केंद्र आणि चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समितीतर्फे श्री संत चोखामेळा महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र मंगळवेढा ते श्री संत तुकोबाराय यांची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र देहुगाव या दरम्यान ‘चोखोबा ते तुकोबा’ या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. संत परंपरा आणि समाजसुधारक यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा वारीचा प्रमुख उद्देश आहे. वारीचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

वारीला रविवार, दि. 1 जानेवारी 2023 रोजी मंगळवेढा येथून सुरुवात होणार असल्याची माहिती चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समितीचे अध्यक्ष आणि जगत्‌‍गुरू संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील, व्यवस्थापक ऋषिकेश सकनुर उपस्थित होते.
मंगळवेढा – पंढरपूर – अरण – सोलापूर – तुळजापूर – धाराशिव – तेर – कसबे तडवळे – येरमाळा – भूम – पाथरुड – खर्डा – जामखेड – सावरगाव घाट – गहिनीनाथगड – पाथर्डी – पैठण – संभाजी नगर – जालना – आनंद गड – सिंदखेड राजा – मेहुणा राजा – वैजापूर – येवला – नाशिक – संगमनेर – लोणी – राहुरी – शिर्डी – श्रीरामपूर – नेवासा – नगर – पिंपळनेर – राळेगणसिद्धी – शिरूर – कोरेगाव भिमा – वढू बुद्रुक – वाघोली – पुणे – आळंदी – देहुगाव असा सुमारे दोन हजार किमीचा समता वारीचा प्रवास मार्ग आहे. वारीचा समारोप गुरुवार, दि. 12 जानेवारी रोजी देहुगाव येथे होणार आहे. तालुका तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी समता या विषयावर आधारित महाविद्यालयीन वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम तसेच कीर्तन, व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे.

वारीचा प्रस्थान सोहळा रविवार, दि. 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समितीचे अध्यक्ष आणि जगत्‌‍गुरू संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर, संत चोखामेळा समाधी मंदिर ट्रस्टचे ह. भ. प. जयराज शेंबडे, लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, शाहू शिक्षण समूहाचे अध्यक्ष, माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, बार्शीचे आमदार राजेंद्र राउत, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीरअण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राला लाभलेल्या सामाजिक समतेची परंपरा दृढ करण्यात संतांचा मोठा वाटा आहे. संत ज्ञानेश्वर यांच्यापासून ते संत तुकाराम महाराज यांच्यापर्यंत साऱ्याच संतांनी महाराष्ट्राच्या भूमीत आपल्या विचारांच्या माध्यमातून समतेची पेरणी केली आहे. संतविचार आत्मसात करून समाजातील अनेक महापुरुष, समाजसुधारक यांनी भेदभाव विरहित समाजजीवन निर्मितीसाठी कार्य उभारले आहे. संतांनी केलेल्या समाजप्रबोधनातून आपला समाज एकसंध राहिला आहे. हाच धागा पकडून चोखोबा ते तुकोबा समतावारी आयोजित करण्यात आली आहे, असे ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: