fbpx

केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरातून अनिल देशमुख यांची अटक – शरद पवार

पुणे – केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांना करण्यात आलेल्या अटकेच्या रूपाने समोर आले असल्याचे मत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पण या प्रकरणात गुंतलेल्या यंत्रणांची आणखी काही माहिती जमा केल्यानंतर मी आणि माझे काही सहकारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून चर्चा करणार आहोत, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या समारोप समारंभासाठी शरद पवार पुण्यात आले होते. या समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर होतो, हे आपण सातत्याने पाहत आहोत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यासह अनेकांची झालेल्या अटकेमुळे पुढे आले आहे. न्यायालयाचा जो काही आदेश आला आहे, त्याचा विचार करून बदल करणे गरजेचे आहे. कारण ज्या व्यक्तीवर १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा पहिला आरोप होता. त्याच्या प्राथमिक आरोपपत्रात साडेचार कोटी रुपयांची तर, अंतिम आरोपपत्रात केवळ १ कोटी रुपयांची अनियमितता दिसून आली नाही. शिवाय यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.’

माजी मंत्री देशमुख यांच्या अटकेने सत्तेचा दुरुपयोग झाल्याचे स्पष्ट झाले असून, या अटकेने एका कर्तव्यदक्ष आणि सुसंस्कृत व्यक्तीला तब्बल १३ महिने तुरुंगात टाकण्यात आले. पण न्याय व्यवस्थेने त्या व्यक्तीला आज न्याय दिला आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या लोकांचा विचार करायला हवा. आतापर्यंत आमच्या काही सहकाऱ्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

आम्ही स्वतः संसदेत आहोत. त्यामुळे मनी लॉंड्रिंग कायद्यात काय बदल करता येतील, यासाठी आम्ही संसदेत बोलणार आहोत. या कायद्यातील बदलांसाठी आम्ही आमच्या आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत काम करत आहोत. हा कायदा बदलण्यासाठी तयारी सुरु केली आहे, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: