fbpx

२० ते २२ जानेवारी दरम्यान रंगणार १६ वा ‘वसंतोत्सव’

पुणे : पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात येणारा ‘वसंतोत्सव’ येत्या २० ते २२ जानेवारी, २०२३ दरम्यान रंगणार असल्याची घोषणा डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू व राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. महोत्सवाचे हे सलग १६ वे वर्ष असून या वर्षीचा वसंतोत्सव कोथरूड येथील म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी सायं ५ ते रात्री १० या वेळेत पार पडेल, अशी माहितीही राहुल देशपांडे यांनी दिली.

वसंतोत्सवच्या आयोजन समितीचे सदस्य बापू देशपांडे, नेहा देशपांडे आणि राजस उपाध्ये हे देखील या वेळी उपस्थित होते.

यावर्षी पी एन गाडगीळ अँड सन्स, सुहाना मसाले, मगरपट्टा सिटी, पेट्रोकेम, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लि. आणि गोखले कंस्ट्रक्शन्स यांचे सहकार्य देखील महोत्सवाला लाभले आहे.

शास्त्रीय गायन, तालवाद्य, लाईट म्युझिक, लाईव्ह बँड यांबरोबर बहारदार गझल्स अशा एकाहून एक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी आम्ही वसंतोत्सवच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत, असे राहुल देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.

वसंतोत्सवच्या पाहिल्या दिवशी अर्थात शुक्रवार दि. २० जानेवारीच्या पहिल्या सत्रात पं. अजॉय चक्रबर्ती यांच्या कन्या व पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती यांचे सुरेल गायन होईल. त्यानंतर राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. पहिल्या दिवसाचा शेवट कौशिकी चक्रबर्ती व राहुल देशपांडे यांच्या बहारदार सहगायनाने होईल. अशा पद्धतीने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच सादरीकरण करणार असल्याने हे महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण असणार आहे.

शनिवार दि. २१ जानेवारीच्या पहिल्या सत्रात ‘द रघु दीक्षित प्रोजेक्ट’ या सुप्रसिद्ध कन्टेम्पररी व भारतीय लोकसंगीतावर आधारित बँडचे सादरीकरण होणार आहे. स्वत: रघु दीक्षित व सहकारी यावेळी सादरीकरण करतील. यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रतिभा सिंह बघेल यांचे व गायक पृथ्वी गंधर्व यांचे एकल गझल गायन होईल. या दोघांनीही बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसाठी गायन केले असून भारतीय संगीत क्षेत्रात नावाजलेले कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे.

प्रतिभा सिंह बघेल यांनी ‘बॉलीवूड डायरीज’, ‘शोरगुल’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘जिद’ व ‘मनकर्णिका’ आदी चित्रपटांसाठी गायन केले आहे. तर युवा कलाकार असलेले पृथ्वी गंधर्व यांनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रटात ‘अलबेला सजन…’ हे गीत गायले आहे. देश विदेशात पृथ्वी यांचे उर्दू शायरी, गझल्स व गाण्याचे ८०० हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. दुस-या दिवसाचा समारोप प्रतिभा सिंह बघेल व पृथ्वी गंधर्व या दोघांच्या एकत्रित गझल गायनाने होईल.

रविवार, दि. २२ जानेवारी रोजी वसंतोत्सवच्या तिस-या दिवसाची सुरुवात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुश्री भट्टाचार्य यांच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाने होईल. ए आर रेहमान यांनी संगीत दिलेली अनेक गाणी ही मधुश्री यांनी गायली असून ‘बाहुबली’, ‘रांझणा’, ‘गुरु’, ‘रंग दे बसंती’, ‘पहेली’, ‘युवा’, ‘स्वदेस’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गायन केले आहे. यानंतर गायक, संगीतकार व चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘म्युझिक अँड मोर’ हा कार्यक्रम होईल. तर १६ व्या वसंतोत्सवाची सांगता राहुल देशपांडे यांच्या नाट्यसंगीत सादरीकरणाने होईल.

१६ व्या वसंतोत्सवची तिकीटे बुक माय शोवर १ जानेवारी, २०२३ पासून उपलब्ध असणार असून सीझन तिकिटाचे दर हे रु. १८००, रु. १२०० व रु. ५०० असे असतील. याशिवाय कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी देखील लवकरच तिकिटे उपलब्ध असणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: