fbpx

क्षमता विकसित केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे स्थान बळकट : डॉ. श्रीकांत परांजपे


पुणे : काही देश राष्ट्रवादाची भूमिका मांडताना आपला गौरवशाली इतिहास पुढे करून वाटचाल करतात परंतु भारताने राष्ट्रवादाची भूमिका घेऊन मार्गक्रमण केल्यास देशांतर्गत पातळीवर सांप्रदायिकतेचा रंग दिला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत देशातील नेतृत्वाने जनमानसाच्या मनातील भूमिका घेऊन मार्गक्रमण सुरू केले आहे. संरक्षण, तंत्रज्ञान, आर्थिक बाबींमध्ये देशाने ठोस पावले उचलल्याने शेजारील राष्ट्रांना भारताच्या भूमिकेचा विचार करावा लागतो. देशाने सर्वच क्षेत्रात आपली क्षमता वाढविली असल्याने बलाढ्य राष्ट्रांमध्ये आता भारताचे स्थान महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे मानद प्राध्यापक डॉ. श्रीकांत परांजपे यांनी केले.

चीन बरोबर युद्ध झाल्यास भारताला कोणतेही राष्ट्र मदतीसाठी पुढे येणार नाही. परंतु युद्ध करणे भारत आणि चीन या दोनही देशांना परवडणारे नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.
नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सहजीवन व्याख्यानमालेत मंगळवारी परांजपे यांचे ‘आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि भारत’ या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी, मुरलीधर घळसासी, राजेंद्र मेहता व्यासपीठावर होते. 

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेल्या काही दशकांतील घडामोडींविषयी अभ्यासपूर्ण विवेचन करून डॉ. परांजपे म्हणाले, भारतासमोर प्रामुख्याने दोन पातळ्यांवर आव्हाने आहेत, ती म्हणजे जागतिक आणि प्रादेशिक. आंतरराष्ट्रीय पातळीवर वांशिक राष्ट्रवाद, मानवी हक्क आणि लोकशाही तर प्रादेशिक पातळीवर दहशतवाद हे मोठे आव्हान आहे. गेल्या काही वर्षांत काही देशांची शकले झाल्याने नवीन राष्ट्रांची निर्मिती झाली. त्याचे थेट पडसाद भारतात मुख्यत्वेकरून काश्मीर प्रश्नावर दिसून आले. ते पुढे म्हणाले, प्रवाहांच्या चौकटीत राहून जागतिक व्यवस्था बदलत चालली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा संदर्भ देऊन ते म्हणाले, वांशिक भेद, मानवी हक्क आणि लोकशाही या मुद्द्यांवर मोठ्या राष्ट्रांची धोरणे ठरत आहेत. या दोन देशातील युद्धाच्या प्रश्नासंदर्भात दबाव असूनही भारताने मात्र तटस्थ भूमिका घेतली असली तरी शांततापूर्ण संवादाने या प्रश्नावर तोडगा काढा असे आग्रही मत मांडले आहे. शांततापूर्ण संवादातून या प्रश्नावर तोडगा निघाल्यास ते भारताचे मोठे यश ठरणार आहे. युक्रेनबाबत इतर देश काय भूमिका घेतात यावर चीन लक्ष ठेवून आहे. कारण तैवान, लडाख, अरुणाचल प्रदेश, भूतान यांच्याविषयीचे चीनचे धोरण ठरणार आहे.
देशाचे प्राधान्य अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याला असल्याने राजकीय स्वातंत्र्याबद्दल नंतर बोलू ही भारताची आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबतची अधिकृत भूमिका आहे. सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळण्यासाठी पाठींबा देऊ असे काही राष्ट्रांनी आमिष दाखविले असले तरी भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आहे.
या वेळी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. परांजपे यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर स्वागत मुरलीधर घळसासी, सुनील माळी, राजेंद्र मेहता यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: