fbpx

नववर्षाच्या स्वागतासाठी ‘उगम’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : हार्मोनियम हे वाद्य केंद्रस्थानी ठेवून, देशभरातील कलाकारांतर्फे सादर होणारा ‘उगम’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. स्वरानुजा म्युझिक इन्स्टिट्यूट’तर्फे नववर्षाच्या संगीतमय स्वागतासाठी आयोजित हा कार्यक्रम रविवार, १ जानेवारी २०२३  रोजी सायंकाळी ५:३० वाजता टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूल’च्या गणेश सभागृहात होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर प्रवेश दिला जाईल. तसेच काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील.

कार्यक्रमाबाबत माहिती देताना इन्स्टिट्यूट’चे मार्गदर्शक व हार्मोनियमवादक तन्मय देवचके म्हणाले, “ स्वरानुजा संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा कार्यक्रमाचे ३ रे वर्ष आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमात गुरु-शिष्यांच्या तीन पिढीतील कलाकार एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहे.”

कार्यक्रमाच्या सुरवातीला तन्मय यांचे भारतभरातील जवळपास ४० शिष्य आपली कला सादर करतील. त्यानंतर तन्मय यांचे गुरु व प्रसिद्ध हार्मोनियमवादक पं. प्रमोद मराठे यांच्या षष्टयब्दीपूर्तीनिमित्त सुप्रसिद्ध अभिनेते सतीश आळेकर यांच्यातर्फे त्यांचा सत्कार केला जाईल.

सर्वात शेवटी तन्मय देवचके हे आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने ‘तन्मय इन हार्मनी’ हा नवीन संकल्पनेचा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमात हार्मोनियम’सोबत तबला, सिंथेसायझर, ड्रम,गिटार आणि पियानो यांसारख्या वाद्यांच्या साथीने तयार होणारे अनोखे संगीत रसिकांना ऐकायला मिळेल. या माध्यमातून हार्मोनियम हे वाद्य एका वेगळ्या पद्धतीत लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रागदारी संगीतासोबतच वेस्टर्न, जॅझ,कर्नाटक संगीत, नाट्यसंगीत, गझल,भावसंगीत असे संगीताचे अनेकविध पैलू रसिकांच्या साथीने उलगडले जातील. त्यांना आशय कुलकर्णी (तबला),अभिषेक भूरूक (पर्कशन), तन्मय पवार (गिटार), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड), अथर्व कुलकर्णी (हार्मोनियम) साथ करतील.

Leave a Reply

%d bloggers like this: