योगशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच
तीन महिन्याचा अभ्यासक्रम: २ ते १४ जानेवारी दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन
पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाला असून त्याला अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकत असून या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक २ जानेवारी २०२३ पासून याचे प्रवेश अर्ज सुरू होत असून दिनांक १४ जानेवारी २०२३ पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. मुख्य म्हणजे वय वर्षे १८ पूर्ण ते ६० वर्षापर्यंत कोणीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. यासाठी ५० जागा असून प्रथम प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी भारतीय तसेच परदेशी विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
विद्यार्थ्यांना याबाबतची अधिक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल अशी माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.दीपक माने यांनी दिली.