fbpx

आर्य संगीत प्रसारक मंडळास यंदाचा ‘रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ’ पुरस्कार जाहीर

पुणे  : व्हायोलिन अकादमी’तर्फे देण्यात येणारा ‘रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ’ पुरस्कार यंदा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळास जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण पंडित फार्म्स येथे दिनांक ५ ते ८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या स्वरझंकार महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी केले जाणार आहे. रुपये २५००० रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याबाबत माहिती देताना व्हायोलिन अकादमीचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये म्हणाले,” संस्थेतर्फे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसार करण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या कार्याला सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे, कारण माझे वडील व्हायोलिनवादक स्व. बाळकृष्ण शंकर उपाध्ये यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे.

पुरस्काराचे यंदा ८ वे वर्ष असून, यावर्षीचा पुरस्कार आर्य संगीत प्रसारक मंडळास देण्यात येणार आहे. मंडळातर्फे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे एक महत्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या या महोत्सवात अनेक ख्यातनाम कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते. या महोत्सवामुळे संगीत क्षेत्रास अनेक दिग्गज कलाकार मिळाले आहेत. त्यामुळेच संस्थेच्या या बहुमोल कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल असे उपाध्ये यांनी सांगितले.

आतापर्यंत संगीतकार प्रभाकर जोग, औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर, गेली अनेक वर्षे परदेशात सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करणारे प्रकाश भालेराव अशा विविध मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: