fbpx

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करून घ्या; ‘ही’ आहे बदल करून घेण्याची शेवटची तारीख 

मुंबई : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाच्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये 15 जानेवारी, 2023 पर्यंत बदल (रिकॅलिब्रेट) करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई यांनी केले आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाना धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम 1.5  किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 21 रुपये होता. आता वाढीव दर 23 रुपये, असा ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 14.20 पैसे होता, तो आता 15.33 पैसे केला आहे. टॅक्सीसाठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वी 25 रुपये होते. तो आता 28 रुपये असा ठरविण्यात आला असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी  16.93 पैसे होता, तो आता 18.66 पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वीचा दर 33 रुपये  भाडेदर होता, तो आता 40 रुपये  असा दर ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 22.26 पैसे होता, तो सुधारित 26.71 पैसे असा ठरविण्यात आला आहे. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून अंमलात आली आहे.

तारखेनुसार पूर्व नियोजित वेळ घेऊन इलेक्ट्रॉनिक मीटर रिकेलिब्रेट केलेल्या वाहनांची चाचणी पूर्व द्रुतगती महामार्ग ( गोदरेज कंपनी गेट क्र.02 विक्रोळी पूर्व, मुंबई) या ठिकाणी दररोज सकाळी 6 ते 10 या वेळेत करण्यात येत आहे. रिकॅलिब्रेशनसाठीची मुदत प्राधिकरणाने दि. 15 जानेवारी 2023 अखेरची दिली असल्याने त्यानंतर मीटर रिकॅलिब्रेशन चाचणीसाठी येणाऱ्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल.

रिकॅलिब्रेशनची मुदत दि. 15 जानेवारी, 2023 पर्यंत असली तरी वाढीव भाडेदर हे दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत. रिकॅलिब्रेट होईपर्यंत सर्व प्रवाशांना व ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांना ठरवून देण्यात आलेल्या दराप्रमाणे प्रवासाचे भाडे अदा करता येतील व घेता येतील. दर हे क्यूआर कोडसह विभागाच्या   https://transport.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर जावून ऑटो रिक्षा व टॅक्सी भाडेवाढ नवीन (New) या टॅबवर क्लिक करून ऑटो रिक्षा, काळी-पिवळी व कूल कॅब टॅक्सीसाठी दराचा आधार घेवूनच भाडेदर प्रवाशांनी अदा करावेत. तसेच संकेतस्थळावर दर हे क्यूआर कोडसह प्रदर्शित केले असल्याने हा क्यूआरकोड ग्राह्य धरण्यात यावा. तसेच ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी देखील रिकॅलिब्रेट होईपर्यंत या दराचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: