fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRA

महाराष्ट्राचा 56 वा वार्षिक निरंकारी संत समागम औरंगाबादमध्ये

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात दिनांक 27, 28 व 29 जानेवारी, 2023 रोजी औरंगाबाद येथील बिडकीन दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर येथे होणार आहे. या समागमाच्या पूर्वतयारीसाठी स्वेच्छा सेवांचा शुभारंभ रविवार, दिनांक 25 डिसेंबर रोजी झाला असून त्याचे विधिवत उद्घाटन परम् आदरणीय श्री.मोहन छाब्रा मेंबर इंचार्ज, ब्रांच प्रशासन, संत निरंकारी मंडळ, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उद्घाटन समारोहाची सुरवात सद्गुरु माता जी व निरंकार प्रभुचरणी हा समागम यशस्वीरित्या पार पडावा या हेतुने प्रार्थना व नमन या रुपात करण्यात आला. या सोहळ्यामध्ये दिल्लीहून संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज श्री जोगिंदर मनचंदाजी यांच्यासह समागम समितीचे चेअरमन, समन्वयक, अन्य सदस्य तसेच महाराष्ट्रातील विविध झोनचे प्रभारी आणि सेवादलचे क्षेत्रीय संचालक व अन्य अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद तसेच आजुबाजुच्या परिसरातून आणि पुणे व महाराष्ट्राच्या अन्य ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल महिला व पुरुष स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण या उद्घाटन समारोहामध्ये सहभागी झाले होते.
उद्घाटन प्रसंगी आपले शुभभाव व्यक्त करताना पूज्य श्री.मोहन छाब्राजी म्हणाले, की संत निरंकारी मिशन हे सत्य, प्रेम, शांती, मानवता आणि विश्वबंधुत्वाचे मिशन आहे. मिशनचा हा दिव्य संदेश प्रसारित करून मानवाला मानवाशी जोडण्याचे कार्य या संत समागमाच्या माध्यमातून केले जाणार आहे. पुरातन काळापासून संत, गुरु-पीर-पैगंबरांनी जो आध्यात्मिकता व मानवतेचा संदेश जगाला दिला तोच संदेश आज वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज विश्वभर देत आहेत. या संत समागमाचाही हाच मुख्य उद्देश आहे.
उल्लेखनीय आहे, की यापूर्वी महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमांची श्रृंखला सन 2019 पर्यंत मुंबई महानगर परिक्षेत्रातच आयोजित होत आली. जानेवारी, 2020 मध्ये 53वा समागम प्रथमच मुंबईबाहेर नाशिकमध्ये आयोजित केला गेला आणि त्यानंतर दोन वर्षे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 2 संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आले जे समस्त भक्तगणांनी प्रभू इच्छा समजून गोड मानून घेतले आणि घरबसल्याच त्या समागमांचा आनंद प्राप्त केला. आनंदाची हीच दिव्य अनुभूती पुनश्च जागृत करण्याच्या हेतूने यावर्षी 56 वा वार्षिक निरंकारी संत समागम भव्य-दिव्य रुपात औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात येत आहे ज्याचे संपूर्ण निरंकारी जगत साक्षी होईल.
समालखा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 75 व्या  वार्षिक निरंकारी संत समागमाच्या नंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रत्येक भक्ताला महाराष्ट्राच्या निरंकारी संत समागमाची प्रतीक्षा असून या 56 व्या समागमाच्या भव्य सोहळ्यामध्ये सहभागी होऊन स्वतःला कृतार्थ करण्यासाठी प्रत्येक निरंकारी भक्त उत्सुक आहे. सद्गुरु माताजींच्या पावन अध्यक्षतेखाली आयोजित होत असलेल्या या दिव्य संत समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक-भक्तगण सहभागी होणार आहेत. समागम स्थळावर दररोज अनेक महात्मा, सेवादलचे महिला व पुरुष स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण आपल्या सेवा प्रदान करणार आहेत.
हा दिव्य संत समागम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झालेले निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक मोठ्या श्रद्धेने आणि तन्मयतेने पूर्वतयारीच्या सेवाकार्यामध्ये आपले योगदान देऊ लागले आहेत. भक्तगणांच्या निष्काम सेवांद्वारे समागम स्थळ एका सुंदर शामियान्यांच्या नगरीमध्ये परिवर्तित झालेले दिसेल ज्यामध्ये भक्तांच्या निवासाची व्यवस्था, जलपान व अन्य मुलभूत व्यवस्था प्रशासन व अधिकाऱ्यांच्या सहयोगाने करण्यात येत आहे. त्याबरोबरच समागम स्थळावर विविध प्रबंध कार्यालये, प्रकाशन स्टॉल, प्रदर्शनी, लंगर, कॅन्टीन आणि डिस्पेन्सरी इत्यादि सुविधा आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहेत.
उल्लेखनीय आहे, की समागमाच्या कार्यक्रमाची संपूर्ण योजना, डिझायनिंग व क्रियान्वयन निरंकारी भक्तांकडूनच पार पाडले जात आहे. भक्तगण या सेवांना आपले सौभाग्य समजून सद्गुरुंच्या आशीर्वादाने लाभलेली सुसंधी मानून मोठ्या आनंदाने निभावत असतात. आध्यात्मिकतेच्या कुंभमेळ्याचे अनुपम दृश्य साकार करणारा हा दिव्य संत समागम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तगणांसाठी प्रेरणादायी व आनंददायी ठरेल असा आयोजकांचा विश्वास आहे.  

One thought on “महाराष्ट्राचा 56 वा वार्षिक निरंकारी संत समागम औरंगाबादमध्ये

  • ravi

    खूप छान…. महाराष्ट्र लोकमंच टीम आपण देत असलेल्या या आध्यात्मिक योगदाना बद्दल खूप आभार.. धन्यवाद टीम महाराष्ट्र लोकमंच

    Reply

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading