fbpx

पंडित हेमंत पेंडसे यांच्या सांगीतिक कारकिर्दीला अभिषेकीबुवांचा अलौकिक स्पर्श : पंडित सुहास व्यास


पुणे : संगीतात गुरू-शिष्य परंपरा महत्त्वाची मानली जाते आणि ती अजूनही टिकून आहे. अभिषेकीबुवांनी प्रत्येक शिष्याला समृद्ध केले. पंडित हेमंत पेंडसे यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांचे गुरू पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्पर्श जाणवतो. पंडित पेंडसे यांनी अभिषेकीबुवांची गायन परंपराच जोपासली आहे असे नाही तर त्यांचे सांगीतिक विचारही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविले आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक, पंडित सुहास व्यास यांनी केले. सत्कार या शब्दाचा विग्रह म्हणजे सत्याचा आकार असणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान याची प्रचिती या सोहळ्यात दिसून आली असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.

जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक, संगीतकार पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य, प्रसिद्ध शास्त्रीय गायक व संगीतकार पंडित हेमंत पेंडसे यांच्या षष्ठ्यब्दिपूर्तीनिमित्त आज (दि. 25 डिसेंबर) शिष्य परिवारातर्फे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंडित व्यास बोलत होते. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध गायक डॉ. विकास कशाळकर, मधुरा पेंडसे, पंडित शौनक अभिषेकी, विदुषी देवकी पंडित, उद्योजक विलास जावडेकर, पंडित हेमंत पेंडसे षष्ठ्यब्दिपूर्ती सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल पटवर्धन, राधिका ताम्हनकर स्वरमंचावर होते.

पंडित व्यास पुढे म्हणाले, गाणारा प्रत्येक कलाकार हा रचनाकार होऊ शकतोच असे नाही कारण त्यासाठी कल्पकता लागते आणि ती अंत:प्रेरणेतून मिळते. रचनाकार म्हणून नावलौकिक प्राप्त होण्यास अभिषेकीबुवांचा पेंडसे यांना आशीर्वाद लाभला आहे. गुरू शिष्याला केवळ शिकवत नाही तर घडवत असतो, अभिषेकीबुवांनी त्यांच्या प्रत्येक शिष्याला समृद्ध केले.
पंडित विकास कशाळकर म्हणाले, पंडित पेंडसे हे उत्तम गायक तसेच उत्तम रचनाकारही आहेत. ते आदर्श शिष्यच नाही तर आदर्श गुरूही आहेत. त्यांचा गुरूंविषयी आदरभाव पाहिल्यानंतर प्रत्येक गुरूला असे वाटते की, आपल्याला असा शिष्य मिळावा. पंडित पेंडसे यांनी आपले गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून त्यांचे रचनाविषयक वैशिष्ट्य आत्मासात केले आहे. पंडित पेंडसे यांनी त्यांचे गाणे समृद्ध केले आहे.

विदुषी देवकी पंडित म्हणाल्या, बुवांच्या कोणत्याही शिष्याला भेटले की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आम्ही एकमेकांना सांभाळत बुवांकडे शिकलो आहोत आणि आजही एकमेकांना जोडलेले आहोत तेही बुवांमुळेच. बुवांनी सगळ्या शिष्यांना भरभरून दिले. शिष्याची शिकण्याची तहान भागवली पाहिजे या विचारातून बुवांनी प्रत्येक शिष्याला मार्गदर्शन केले. नवीन करू नका तर नव्याने करा हा विचार बुवांनी प्रत्येक शिष्याला दिला. गुरूला वाहून घेण्याची वृत्ती पंडित पेंडसे यांच्याकडे आहे. त्यांनी कायम शिष्याच्या भूमिकेत राहून ज्ञान प्राप्त करून घेतले आहे त्यामुळे त्यांच्यातील रचनाकार घडणे हे प्रासादिक आहे.

सत्कारला उत्तर देताना पंडित हेमंत पेंडसे म्हणाले, हा सोहळा सुहृदांचा आहे. अभिषेकीबुवांनी संस्कार केलेल्या माझ्यासारख्या छोट्या कलाकारासाठी आपण उपस्थित राहिलात याबद्दल मी ऋणी आहे. अभिषेकीबुवांचे शिष्य म्हणून समृद्ध होताना आम्हाला त्यांनी केलेले संस्कार आणि विद्याताईंच्या प्रेमाने अजूनही एकत्र बांधले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंडित हेमंत पेंडसे यांच्या संगीत रचनांची झलक, मित्रपरिवार व कलाकारांनी व्यक्त केलेले मनोगत दृक्‌‍श्राव्य माध्यमातून दाखविण्यात आले.
सत्कार सोहळ्यानिमित्त पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र आणि शिष्य पंडित शौनक अभिषेकी, विदुषी अपर्णा गुरव आणि युवा गायिका राधिका ताम्हनकर यांचे गायन झाले. भरत कामत, सुयोग कुंडलकर, मिलिंद गुरव, राज शहा, अभिजित बारटक्के, स्वानंद कुलकर्णी, उद्धव गोळे, आदित्य आपटे यांनी साथसंगत केली. कलाकारांचा सत्कार राधिका पटवर्धन, विलास जावडेकर, अनिल पटवर्धन, रघुनाथ टिळक, अमृता सहस्त्रबुद्धे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर आभार निखिल केंजळे यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: