सर्वस्व अर्पून मुलांना घडविते ती आई – योगगुरु डॉ.संप्रसाद विनोद यांचे मत
पुणे : प्रत्येक आईचे लक्ष हे मुलांना घडविण्यात केंद्रीत झालेले असते. मुलांना घडवून प्रत्येक माता या समाजाची मदतच करीत असतात. सर्वस्व अर्पून मुलांना घडविते ती आईच असते. मात्र, आजच्या काळात आई-वडिलांकडे अडगळ म्हणून पाहिले जाते. त्यांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. त्यामुळे अशा वातावरणात मातृगौरव सारखे कार्यक्रम महत्वाचे आहेत, असे मत योगगुरु डॉ.संप्रसाद विनोद यांनी व्यक्त केले.
श्री ज्ञानेश्वरी वाचन मंदिर पुणे, अखिल मंडई मंडळ आणि मातृगौरव न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णानंद सरस्वती यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त अकरा कर्तृत्ववान ज्येष्ठ मातांचा गौरव करण्यात आला. अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ज्येष्ठ शिक्षीका स्वाती पंडित, आबा बागुल, अॅड.प्रताप परदेशी, आनंद सराफ, पराग ठाकूर, विनायक घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सुलोचना निजामपूरकर, कमल शेंडगे, सत्यवती किराड, सुलभा जाधव, सीमा पिंपळे, आसावरी काळे, वैशाली विसाळ, शर्मिला पानसे, विजया कुलकर्णी, वैशाली शेठ, नीलम चौहान या मातांसह शिल्पा सबनीस या मातेचाही विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, तुळशीवृंदावन, फुलांची परडी, शारदा गजाननाची प्रतिमा, मिठाई, उपरणे व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
उल्हास पवार म्हणाले, भारतीय अध्यात्मिक सांप्रदायात माऊली शब्दाला विशेष महत्व आहे. परमेश्वराचे पृथ्वीवर वावरणारे रुप म्हणजे आई. आई-वडिलांसह मावशी, मामा, आत्या अशी नाती इतिहासजमा होण्याची वेळ आली आहे. मात्र, एकत्र कुटुंबाच्या माध्यमातून ही नाती टिकविण्याचे व जगविण्याचे काम आई करीत असते. आई-वडिल अपार कष्ट व मेहनत करुन आपापल्या मुलांना घडवितात. त्यामुळे ते कष्ट व ती मेहनत प्रत्येक मुलापर्यंत पोहोचायला हवी, तरच त्या कष्टाचे मोल नव्या पिढीला समजेल.
आनंद सराफ म्हणाले, आई हेच मुलासाठी मोठे विद्यापीठ असते. ज्या मुलाला आईच्या ह्रदयाचे ठोके वाचता येतील, तो खरा सुपुत्र असतो. मुलांच्या यशात स्वत:चा आनंद शोधणा-या आणि मी पणा ज्यांच्या शब्दकोशात नाही, अशा मातांचा सन्मान आम्ही दरवर्षी करतो, असेही त्यांनी सांगितले. गिरीष पोटफोडे, वैशाली कोंडे, सारंग सराफ, अनील रुपनूर, रोहित पवार, कल्याणी सराफ यांनी आयोजनात सहभाग घेतला. माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले.
