fbpx

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर -डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : आदिवासी विकास विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ८५ हजार घरकुले मंजूर करण्याचा निर्णय चालू अधिवेशनात शासनाने घेतला आहे. आदिवासी बांधवांसाठी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातील मंजूर करण्यात आलेली घरकुलांची ही सर्वात मोठी संख्या आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

कोपर्ली येथे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, सरपंच सौ. ज्योती वानखेडे, उपसरपंच अरूण अहिरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गिरासे, सौ. मुखाबाई वळवी, जुलेलखाबी खाटीक, सौ.नलिनी गुजराथी, मंगला पवार, राजेंद्र पवार, सौ. वंदना पवार, नजूबाई भिल, विजया तावडे आदी उपस्थित होते.

डॉ. गावित यावेळी म्हणाले की, आपल्या राज्यात प्रत्येकासाठी वैयक्तिक लाभाच्या व विकासाच्या योजना आहेत, त्या जनतेपर्यंत पोहचवणे ही शासनासोबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गावातील ज्यांचे आधार, रेशन, पॅन कार्डस् बॅंक खाते आहे अशा नागरिकांची एक यादी तयार करून योजनांच्या लाभाकरीता त्यांचे वर्गीकरण केल्यास संबंधितांना त्याचा लाभ मिळावा, याकरीता शासन वचनबद्ध आहे.

तापी नदीचे पाणी घराघरात पोहचेल – डॉ. सुप्रिया गावित

जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ज्या तापी नदीचे पाणी आजपर्यंत केवळ शेतापर्यंत होते ते जलजीवन योजनेच्या माध्यमातून घराघरात नळाद्वारे, शुद्ध करून पोहचविले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात असून या उपक्रमातून गावातील प्रत्येक नागरिकांच्या समस्येचे निराकरण जागेवरच केले जात आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावर अडलेली कामे त्वरित होणार आहे, त्यामुळे सर्वांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले.

२०५४ पर्यंत पुरेल एवढे पाणी देणार – डॉ. हिना गावित

केंद्र सरकारच्या या जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०५४ पर्यंतच्या वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या पाणी क्षमतेचे नियोजन करण्यात येणार असून प्रत्येक गाव, घर आणि घरातील व्यक्ती या योजनेत केंद्रस्थानी ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. ‘हर घर नल व शुद्ध जल’ ही संकल्पना यातून साकार होणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: