भक्तिवेदांत संशोधन केंद्र आणि पुणे विद्यापीठात सामंजस्य करार
पुणे : भक्तिवेदांत संशोधन केंद्र (बीआरसी) पुणे आणि तत्त्वज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. बीआरसी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गेल्या दोन वर्षांपासून मान्यताप्राप्त संशोधन केंद्र आहे. बीआरसी लायब्ररीमध्ये २२ हजार पेक्षा जास्त प्राचीन भारतीय धर्मग्रंथ, हस्तलिखिते आणि जर्नल्स आहेत. या कराराच्या माध्यमातून तत्त्वज्ञान आणि प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांना मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. बीआरसीचे संस्थापक गौरांग दास, भक्तिवेदांत संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. जनार्दन चितोडे, भक्तिवेदांत संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉ. के. एन. धुमाळ, पुणे विद्यापीठाचे तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. श्रीधर आकाशकर, पुणे विद्यापीठाच्या मानव्य विज्ञान शाखेचे आधिष्ठाता डॉ. विजय खरे, बीआरसी सचिव भूषण चौधरी तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. बीआरसी जगभरातील नामवंत संशोधकांबरोबर कार्यशाळा, चर्चासत्रे आणि परिषदा आयोजित करते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, हा सामंजस्य करार पुणे विद्यापीठ आणि बीआरसीच्या अभ्यासकांमध्ये संशोधन, कार्यशाळा, पेपर प्रकाशनांना प्रोत्साहन देईल.
बीआरसीचे संस्थापक गौरांग दास म्हणाले, भारतीय संस्कृतीवर संशोधनाची नितांत गरज आहे. इस्कॉन आणि बीआरसी मधील मोठ्या संख्येने लोक पुणे विद्यापीठात संशोधनाच्या प्रतीक्षेत आहेत.
भक्तिवेदांत संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. जनार्दन चितोडे यांनी जगभरात बीआरसीने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची यावेळी ओळख करून दिली. ते म्हणाले, बीआरसीचे जगभरात अस्तित्व आहे आणि प्राचीन भारतीय धर्मग्रंथ आणि हस्तलिखितांचे संशोधन, जतन, अध्यापन आणि देखभाल यामध्ये त्यांचा सहभाग आहे.
भक्तिवेदांत संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉ. के. एन. धुमाळ म्हणाले, वैद्यकशास्त्र, फार्मसी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन या विषयांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत, परंतु तत्त्वज्ञान आणि संस्कृतीसाठी अतिशय मर्यादित वाव आणि सुविधा उपलब्ध आहेत. या सामंजस्य करारामुळे ही परिस्थिती बदलण्यास मदत होईल.
