Solaris Cup – ध्रुवी अडियनथाया हिला दुहेरी मुकूट; हंसल शहा याला एकेरीचे विजेतेपद !!
पुणे : सोलारीस क्लब आणि रविंद्र पांड्ये टेनिस अॅकॅडमी तर्फे आयोजित ‘सोलारीस करंडक’ अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (१४ वर्षाखालील) स्पर्धेत पुण्याच्या ध्रुवी अडियनथाया आणि गुजरातच्या हंसल शहा यांनी एकेरीचे विजेतेपद संपादन केले. ध्रुवी हिने एकेरी आणि दुहेरीमध्ये विजय मिळवत स्पर्धेत दुहेरी मुकूट पटकावला. सार्थक गायकवाड, शौनक सुवर्णा, स्वनिका रॉय यांनी दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.कोथरूड येथील सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या मुलींच्या एकेरीच्या गटात पुण्यातील ध्रुवी अडियनथाया हिने अग्रमनांकित स्वनिका रॉय हिचा ६-२, ३-६, ६-२ असा सनसनाटी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. दोन तास झालेल्या सामन्यात ध्रुवी हिने पहिला सेट ६-२ असा जिंकून आश्वासक सुरूवात केली. दुसर्या सेटमध्ये स्वनिका हिने सामन्यात परत येताना ६-३ असा सेट जिंकत १-१ अशी बरोबरी निर्माण केली. अंतिम आणि निर्णायक सेटमध्ये ध्रुवी हिने बेस लाईनवरून आणि नेटच्या जवळून अधिक अचूक खेळ करत ६-२ असा सेट जिंकून विजेतेपद मिळवले.
दुहेरीच्या गटामध्ये ध्रुवी अडियनथाया आणि स्वनिका रॉय या जोडीने हिया कुगासिया आणि त्विशा नंदनकर या जोडीचा ६-४, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद संपादन केले. ध्रुवीने एकेरी आणि दुहेरीमध्ये विजय मिळवत स्पर्धेत दुहेरी मुकूट पटकावला. ध्रुवी कै.शामराव कलमाडी हायस्कूलमध्ये ७ वी ईयत्तेमध्ये शिकते. २०२२ वर्षामधील १४ वर्षाखालील गटाचे तिचे हे चौथे विजेतेपद असून सोलारीस करंडक स्पर्धेत तिो पहिलेच विजेतेपद ठरले. ध्रुवी ही ऐम्स् टेनिस अॅकॅडमीमध्ये केतन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिकते.
एकेरीमध्ये मुलांच्या गटात गुजरातच्या हंसल शहा याने तिसर्या मानांकित आणि पुण्याच्या शौनक सुवर्णा याचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपदक मिळवले. दुहेरी गटामध्ये सार्थक गायकवाड आणि शौनक सुवर्णा यांनी वरद पोळ आणि हंसल शहा या जोडीचा ३-६, ६-४, १४-१२ असा सुपर टायब्रेकमध्ये पराभव करून विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली, स्पर्धेचे संचालक रविंद्र पांड्ये, राजेश आणि सारीका गदाडे, विशाल सावत, आशिष जोगळेकर, एमएसएलटीए निरिक्षक तेजल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्या आणि उपविजेत्या सर्व खेळाडूंना करंडक, प्रशस्तिपत्रक, बॅग अशी पारितोषिके देण्यात आली. आभार क्लबचे समन्वयक राजेश सपकाळ यांनी मानले.
स्पर्धेचा संक्षिप्त निकालः मुख्य ड्रॉः अंतिम फेरीः मुलीः
ध्रुवी अडियनथाया वि.वि. स्वनिका रॉय (१) ६-२, ३-६, ६-२;
हिया कुगासिया/त्विशा नंदनकर वि.वि. अस्मि टिळेकर/तीशा पटेल ६-३, ६-४;
स्वनिका रॉय/ध्रुवी अडियनथाया वि.वि. सारा फेंगसे/वीरा डरपुडे ६-२, ६-४;
अंतिमः स्वनिका रॉय/ध्रुवी अडियनथाया वि.वि. हिया कुगासिया/त्विशा नंदनकर ६-४, ६-०;एकेरीः मुलेः हंसल शहा वि.वि. शौनक सुवर्णा (३) ६-२, ६-४;
वरद पोळ/हंसल शहा वि.वि. राम मगदुम/वरद उंड्रे ७-६ (४), ६-०;
अंतिमः सार्थक गायकवाड/शौनक सुवर्णा वि.वि. वरद पोळ/हंसल शहा ३-६, ६-४, १४-१२.