fbpx

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेसाठी टेनिस शौकीन पुनरागमनासाठी सज्ज

पुणे : दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250स्पर्धा असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या पाचव्या सत्रासाठी टेनिस शौकिनांचे पुनरागमन होणार असुन ही स्पर्धा प्रचंड उत्साहात पार पडणार आहे.
कोविड 19 महामारीमुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय पार पडली होती. परंतु यंदा 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023दरम्यान पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडणाऱ्या पाचव्या सत्राला प्रेक्षक उपस्थित राहू शकणार आहेत.
या स्पर्धेची तिकीटे 26 डिसेंबर पासून zoonga.com उपलब्ध होणार आहेत. तसेच, https://www.zoonga.com/tataopen यावर ही तिकीटे आरक्षित करता येणार आहेत.
याविषयी बोलताना टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे संचालक व एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार म्हणाले की, टेनिस शौकिनांचे स्वागत करताना आम्हाला पुन्हा एकदा आनंद होत आहे. गतवर्षी सुरक्षेच्या कारणास्तव मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश होता. परंतु यंदा स्पर्धेची दारे टेनिस शौकिनांसाठी खुली करण्यात आली असून आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक प्रचंड संख्येने उपस्थित राहतील, अशी आम्हाला खात्री वाटते.
अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, कोणत्याही खेळासाठी प्रेक्षक हे अत्यंत महत्त्वाचा घटक असतात. त्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणतीही स्पर्धा होऊ शकत नाही. मैदानावरील चुरस व उच्च दर्जाच्या खेळामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळते व प्रेक्षक गॅलरीत भावी स्टार खेळाडू घडतात. टाटा ओपन महाराष्ट्र भारतातील सर्वोत्तम स्पर्धा असुन यंदा अनेक दिग्गज खेळाडू आपल्या खेळाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. युवा खेळाडूंना त्यांचा खेळ जवळून पाहून त्यातून शिकण्याची संधी मिळणार आहे.
स्टेडियम मधील ब्लॉक ए, बी, सी, डी ई, एफ जी या ब्लॉकसाठीची तिकीटे प्राथमिक फेऱ्यासाठी 150 ते 750रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. उपांत्य फेरीसाठी 250 ते 1500 तर अंतिम फेरीसाठी 500 ते 1750 अशा दरांची तिकीटे उपलब्ध आहेत. पात्रता फेरीसाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.
पुरुष एकेरी विजेतेपदासाठी 2014 अमेरिकन ओपन विजेता व जागतीक क्रमांक 17 मरीन चिलिच मुख्य आव्हानवीर आहे. तर, दुहेरीसाठी राजीव राम व जॉय सलिसब री ही तीन ग्रँड स्लॅम जिंकणारी जोडी प्रमुख दावेदार ठरेल.
आयएमजीच्या मालकीच्या व राईज यांच्या कडून व्यवस्थापन करण्यात आलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने भारत सरकारच्या सहकार्याने केले आहे. टाटा मोटर्स हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहे. स्पर्धेच्या पात्रता फेऱ्या 31 डिसेंबर पासून सुरू होणार असून तर मुख्य स्पर्धा 2 ते 7 जानेवारी दरम्यान रंगणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: