fbpx

शाहिरांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेणार: सुधीर मुनगंटीवार

नागपूर : राज्यातील शाहिरांच्या समस्यांची शासनाला जाणीव असून त्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना.श़्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्य विघिमंडळाच्या अधिवेशनात मोर्चा घेऊन आलेल्या महाराष्ट्र शाहिर परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ना.श्री.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या संस्कृतीत शाहिरांचे मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राचा इतिहास गावागावात लोकांच्या मनात जीवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केले आहे. अशा शाहिरांकडे शासन दुर्लक्ष करणार नाही. मात्र अनुदानाच्या मदतीवर शाहिरांनी अवलंबून राहू नये तर त्यांना काम देता यावे असा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या प्रसिद्धी प्रसाराच्या कामी शाहिरांची कला कशी वापरता येईल याची चाचपणी करीत आहोत असे त्यांनी शाहिरांच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितले.

कोरोना काळात कलाकारामना मदत देण्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली मात्र त्यासाठी माहिती गोळा करण्याचे काहीही काम तत्कालीन सरकारने केले नाही. त्यामुळे कलाकारांना तेव्हा मदत मिळू शकलेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळेच आता आपण राज्यातील कलाकारांचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत असेही श्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

या शिष्टमंडळात महाराष्ट्र शाहिर परिषदेचे हितचिंतक श्री संजयजी बजाज, महाराष्ट्र शाहिर परिषदेचे पदाधिकारी शाहिर श्री राजेंद्र बावनकुळे, श्री भगवानजी लामजेवार, श्री ज्ञानेश्वर मांढरे, श्री अंबादास नागदिवे, श्री नरहरी वासनिक, श्रीमती दीपमैला मालेकर, श्री गणेश देशमुख, श्री अरूण मेश्राम, पत्रकार खंडूराज गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री सौरभ विजय यांच्यासह काही प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: