fbpx

उस्ताद राशीद खान व उस्ताद शाहीद परवेज यांच्या जुगलबंदीने रंगला ‘सवाई’चा माहोल  

पुणे  : सुप्रसिद्ध गायक उस्ताद राशीद खान व सतारवादक उस्ताद शाहीद परवेज या दोन सुप्रसिद्ध कलाकारांच्या जुगलबंदीने ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाचा माहोल रंगला. चौथ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत रसिकांनी या श्रेष्ठ कलाकारांच्या सादरीकरणाचा मनमुराद आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी ‘याद पियां की आयें…’ ही बहारदार ठुमरी एकत्रित सादर केली.

त्या आधी उस्ताद राशिद खान यांनी मालकंस रागाने आपल्या गायनाला सुरूवात केली. आज पंडितजींची खूप आठवण येत आहे. मी जेव्हा पहिल्यांदा सवाईत आलो, त्यावेळी माझ्यासाठी त्यांनी प्रेमाने तानपुरा लावून दिला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. मालकंस रागात त्यांनी ‘जिनके मन राम बिराजे.. ‘ ही विलंबित बंदिश आणि ‘याद न आवत मोरी प्रीत..’ व ‘आज मोरे घर आये न बलमा..’ या द्रुत बंदिशी सादर केल्या. त्यांना ओजस अढीया ( तबला), साबीर खान  (सारंगी), नागेश पाडगावकर, निखील जोशी व राशीद खान यांचे सुपुत्र अरमान खान (गायन व तानपुरा) यांनी साथसंगत केली. यानंतर शाहीद परवेज यांनी राग झिंझोटीमध्ये आलाप,जोड, झालाचे सादरीकरण केले. सवाई गंधर्व महोत्सवात सादरीकरण करता यावे यासाठी आम्ही वर्षभर वाट पहात असतो असे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांना ओजस अढीया यांनी समर्पक तबलासाथ केली.

Leave a Reply

%d bloggers like this: