fbpx

विराज जोशी, सीड श्रीराम या नव्या पिढीच्या दर्जेदार कलाकारांचे ‘सवाई’ सादरीकरण

पुणे  : भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे नातू व श्रीनिवास जोशी यांचे पुत्र विराज जोशी आणि श्रीवल्ली या लोकप्रिय गीताचे गायक सीड श्रीराम या नव्या पिढीच्या दर्जेदार कलाकारांचे सादरीकरण चौथ्या दिवसाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आकर्षण ठरले. रसिक श्रोत्यांनीही या कलाकारांना मनापासून दाद देत त्यांचे कौतुक केले.

किराणा घराण्याचे उदयोन्मुख गायक असलेल्या विराज जोशी यांनी राग मारुबिहागने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी विलंबित एकताल ‘रसिया हो ना…’ ही व दृत तीन तालातील ‘परी मोरी नाव…’ व ‘दरपत रैन दिना…’ या रचना प्रस्तुत केल्या.

पं. भीमसेन जोशी यांच्या ‘संतवाणी’ या कार्यक्रमाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यातेच औचित्य साधत त्यांनी अजरामर केलेल्या भक्तीसंगीताची झलक विराज यांच्या गायनाने रसिकांनी अनुभविली. यामध्ये पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही रचनांचे तुकडे गुंफण्यात आले होते, हे विशेष. या दरम्यान त्याने ‘नामाचा गजर…’, ‘रूप पाहता लोचनी…’, ‘बाजे मुरलिया बाजे…’, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’, ‘जो भाजे हरी को सदा…’, ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट…’ या रचना सादर केल्या.

या वेळी विराज यांना अविनाश दिघे (संवादिनी), पांडुरंग पवार (तबला), सुखद मुंडे (पखावज) व माऊली टाकळकर (टाळ), पांडूरंग पाटोळे, दशरथ चव्हाण, रवी पंडित (तानपुरा), अपूर्व द्रविड यांनी (तालवाद्य) तर राहुल गोळे (ऑर्गन) अशी साथसांगत केली.

विराजाचे कौतुक करण्यासाठी एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्या लिबरल आर्टस् विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती जोशी, तेथील शिक्षक वृंद व त्याचे सहाध्यायी विद्यार्थी मित्र उपस्थित होते. सादरीकरणानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी विराज यांचा सत्कार करीत कौतुक केले.

यानंतर सुप्रसिद्ध गायक सीड श्रीराम यांनी कर्नाटक शैलीतील संगीताची सुरेल अनुभूती उपस्थितांना दिली. त्यांनी राग कावेरीमधील वर्णम सरसुदाने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘परी दनमी चिथे…’ ही राग भिलहारी, ‘श्री सत्यनारायणा…’ ही राग सुबहापंतूवरली मधील प्रस्तुती केली. सरासासमा ही रचना राग कापी नारायणीमध्ये सादर केली. त्यानंतर त्यांनी आलाप- तोडी मध्ये कडनुवारीकी निरावळ आणि ‘जगादो उधाराणी…’ , ‘राधा समेथा..’ व ‘कुरई ओन्ध्रम इलाई…’ या  कर्नाटक शैलीत त्यांनी सादर केलेल्या विविध रचनांनी रसिक प्रेक्षकांची वाह वाह मिळविली. श्रीवल्ली या अलीकडेच गाजलेल्या गीताने सीड श्रीराम तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत आज त्यांच्या कर्नाटक संगीताच्या प्रस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्हायोलिन आणि घटम् सोबत प्रस्तुत झालेले सवाल जवाब चांगलेच रंगले. त्यांना राजीव मुकुंदम (व्हायोलिन), जे. वैद्यनाथन (मृदमगम्), डॉ. एस. कार्तिक (घटम्) व विनायक कोळी यांनी तनपु-यावर साथसंगत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: