Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

यशस्वी सरपोतदार, भारती प्रताप यांच्या गायनासोबतच उमाकांत गुंदेचा व अनंत गुंदेचा यांच्या धृपद गायनाने सवाईच्या चौथ्या दिवसाची दमदार सुरुवात

पुणे  : ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरूवात महोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करणाऱ्या यशस्वी सरपोतदार यांच्या दमदार गायनाने झाली. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका पद्मा तळवलकर यांच्या शिष्या असलेल्या यशस्वी सरपोतदार यांनी महोत्सवाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आपली कला सादर केली. त्यांनी राग गौड सारंगने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. हरकती आणि लयकारी यांचा सुंदर मेळ त्यांच्या सादरीकरणात पहायला मिळाला. स्वरमंचावरून सादर होणारे सुरेल गायन आणि त्याला रसिकांकडून मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद अशा उत्साही वातावरणात महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात झाली.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी या महोत्सवात साजरी होत असताना मला पहिल्यांदाच या व्यासपिठावर कला सादर करण्याची मिळत असलेली संधी मोलाची आहे असे सांगत सरपोतदार यांनी ‘कजरारे गोरी तोरे नैना…’ ही विलंबित ख्याल बंदिश सादर केली.  त्यांनी सादर केलेल्या मध्यलय तीन तालात ‘पियू पल लागी मोरी अखियां…’ या बंदिशीने रसिकांची मने जिंकली. ‘रंग डारूंगी नंद के लालन पे…’ या होरीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), पं. रामदास पळसुले (तबला ), राधा आणि मयुरी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

रसिक प्रेक्षकाची दाद ही प्रत्येक कलाकारासाठी व आयोजकांसाठीही महत्त्वाची असते. हेच लक्षात घेत यशस्वी सरपोतदार यांचा सत्कार प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या सरिता कानडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर धृपद गायक उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंदेचा यांचे सहगायन झाले. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाखातर मी अनेकदा महोत्सवात आपली कला सादर केली आहे असे सांगत उमाकांत गुंदेचा म्हणाले, “धृपद हा गायनाचा प्राचीन प्रकार असून, साम वेदातून त्याची निर्मिती झाली असल्याचे मानले जाते. अभिजात शास्त्रीय गायकीचे व्याकरण हे येथूनच आले असे मानतात.”

२००४ साली भोपाळ येथील आमच्या धृपद संस्थान या गुरुकुलचे उद्घाटन पंडित भीमसेन जोशी यांनी केले होते. त्यांच्या आशीर्वादानेच आज गुरुकुल अतिशय उत्तम प्रकारे कार्यरत आहे, असे सांगत त्यांनी भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. गुंदेचा यांनी राग चारुकेशीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी पारंपरिक आलाप, विलंबित, मध्यलय अर्थात आलाप जोड झाला यांचे दमदार सादरीकरण केले. यानंतर त्यांनी चौदा मात्रेतील धृपद धमार प्रस्तुत केला. राग अडाणामधील ‘शिव शिव शिव शंकराधिदेव…’ या शिवस्तुतीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.

त्यांना बंधू पं. अखिलेश गुंदेचा व ज्ञानेश्वर देशमुख यांनी पखवाजवर तर दिगंबर जाधव व जान्हवी फणसळकर यांनी तानपु-यावर साथ केली. यानंतर मुकुंद संगोराम लिखित ‘सुर श्रेष्ठ’ या पुस्तकाचे प्रकाशन आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी व सुरेश एजन्सीचे शैलेंद्र कारले यांच्या हस्ते करण्यात आले. तर पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक असलेल्या गिरीश संझगिरी यांनी पंडित फिरोज दस्तूर यांच्या जीवनावर लिहिलेला चरित्रग्रंथ ‘घट घट मै संगीत समाये’ याचे व ‘चंद्रमुखी’ या संझगिरी यांच्या स्वरचित बंदिशीचे पुस्तक यांचे देखील प्रकाशन करण्यात आले.

यानंतर आग्रा घराण्याच्या बंगळूरू स्थित गायिका भारती प्रताप यांनी राग श्री ने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी ‘सांज भई…’ ही विलंबित एकतालातील रचना प्रस्तुत केली. त्यांनी सादर केलेल्या उस्ताद खादीम हुसैन खां यांनी रचलेली ‘गरिब नवाज हो तुम…’ ही रचना व राग खमाजमधील तराण्याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या पुरंदरदास यांच्या कानडी अभंगाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना अभिनय रवांदे (संवादिनी), रविंद्र यावगल (तबला) तर कृष्णेंद्र समर्थ व वैदेही अवधानी (तानपुरा) साथ केली

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading