fbpx

2050 मध्ये लागणाऱ्या विजेची पूर्तता करणे हे माझे मुख्य लक्ष्य – राजेंद्र पवार

पुणेः- इलेक्ट्रिक वाहनांसाठी केंद्र सरकारचे असलेले प्रोत्साहन आणि पुणे शहरात ड्रिम सिटी अंतर्गत मेट्रोसह
येणारे अनेक विकासात्मक प्रकल्प पाहता भविष्यात विजेची प्रचंड मागणी वाढणार आहे. आगामी 2050 मध्ये लागणाऱ्या विजेची तजवीज आणि नियोजन करणे हे माझ्या पुढील प्राधान्य क्रमाचे लक्ष्य आहे, असे मत महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून राजेंद्र पवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून यानिमित्त आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ विचारवंत, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पवार यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सन्मानपत्र, पुणेरी पगडी, शाल आणि श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप आहे.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे संचालक सचिन ईटकर, ज्ञान फौंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते आणि आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, मुख्य अभियंता पदी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, परंतु त्या बरोबरीने जबाबदारी वाढवणारी देखील आहे. आज रोज सुमारे दहा हजार वीज मीटर जोडणी आम्ही देत आहोत. घरगुती विजेसह औद्यागीक आस्थापनांची देखील विजेची मागणी वाढत चालली आहे. आत्ताच मागणी आणि पुरवठा गणित जुळवुन आणतांना आमची कसरत होत आहे. परंतू, आम्ही आमची जबाबदारी जाणून विनाखंडित वीज पुरवठा करणे ही माझ्यासह सर्व अभियंत्यांनी मनाशी बांधलेली खुणगाठ आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही आमच्या विभागामार्फत पगारी समाजसेवा करीत आहोत. या सेवेवर आधारित विभागामुळे आंतरिक समाधान लाभते.

यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, सेवेचे व्रत स्विकारलेले हे प्रकाशयात्री आहेत. नाशिक मधील देवळा सारख्या खेडे गावांतून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पवार यांनी यशाचे हे शिखर गाठले आहे. आई-वडिलांनी केलेले संस्कार आणि सामाजिक बांधिलकी मानणारे पवार हे दुर्मिळ मुख्य अभियंता आहेत.

यावेळी बोलताना सचिन ईटकर म्हणाले की, समाजात आंब्याच्या आणि अशोकाच्या झाडांसारखी काही मंडळी असतात. अशोकाचे झाड हे केवळ सरळ वाढते त्याला ना फळे – फुले येतात ना त्याची सावली पडते. परंतु समाजात काही लोक हे अंब्याच्या झाडे सारखे असतात. ते सावलीही देतात, फळेही देतात आणि जेवढे मोठे होतात तेवढे नम्र होऊन जमिनीच्या दिशेने झुकून नम्रतेचे उदात्त उदाहरण समाजा समोर ठेवतात. पवार हे दुसऱ्या वर्गवारीत मोडणाऱ्यांपैकी आहेत. सर्वसाधारणपणे पोट भरले की नागरिक त्यांचे मूळ विसरतात. परंतु पवारांनी त्यांची मुळेही जपली असून समाजात नवीन ऋणानुबंध ही प्रस्थापित केले आहेत. म्हणूनच पवार यांचा सत्कार हा त्यांच्या पदाच्या सत्कारा बरोबरच त्यांनी जपलेल्या माणुसकीचाही सत्कार आहे. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासात महावितरणचा मोलाचा वाटा आहे. पवार हे ग्रामीण भागातून आल्याने ते संवेदनशीलता बाळगून असून कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना प्राधान्याने स्थान दिले जाते, ही महत्त्वाची बाब आहे.

यावेळी ज्ञान फौंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: