जालना जिल्ह्यातील ऑनर किलिंग प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी – डॉ. नीलम गोऱ्हे
जालना: जिल्ह्यातील पीर-पिंपळगाव येथे राहणाऱ्या संतोष सरोदे या पित्यानेच आपल्या १७ वर्षीय लेकीची बदनामीच्या भीतीनं हत्या केली आहे. मुलगी नात्यातील मुलाबरोबरच काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने समाजात बदनामी झाल्याचा राग मनात धरून बापानेच आपल्या मुलीची फाशी देऊन हत्या केली. नंतर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पोलिसांनी ग्रामस्थांच्या सूचनेवरून या आरोपींना तात्काळ अटक केल्याने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात असे निवेदन आज त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या निवेदनात त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत :
या आरोपींना तात्काळ लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी तपास लवकरात लवकर करावा व चार्जशीट न्यायालयात दाखल करावे.
या घटनेमुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आवश्यक कार्यवाही करावी यासाठी पोलिस यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.
जालना जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या मदतीने शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्थामध्ये सेफ कॅम्पस योजना तसेच समुपदेशन वर्गांचे आयोजन शिक्षण विभागामार्फत करावे. सामाजिक स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळता येऊ शकतील.