Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

मानसिक आरोग्य विषयात काम करताना सह-अनुभव महत्वाचा – डॉ. मोहन आगाशे

पुणे : “ अभिनय करताना, काही वेळा तो नीट जमला नाही, तर दिग्दर्शक ओरडायचे. ते सांगायचे की चांगले काम करायचे असेल, तर त्या व्यक्तीला, त्याच्या परिस्थितीला समजून घे आणि मग काम कर. मानसिक आरोग्य या विषयाचेदेखील असेच आहे. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला समजून घेणार नाही, त्याची परिस्थिती जाणून घेणार नाही, तोपर्यंत आपण ‘देखल्या देवाला दंडवत’ असेच काम करणार. मानसिक आरोग्य विषयात काम करताना सह-अनुभव हा महत्वाचा भाग आहे,’’ असे मत मानसोपचार तज्ज्ञ व अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

डॉ. जगन्नाथ वाणी यांनी संस्थापित केलेल्या स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) , या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती व त्यांच्या पालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विधी महाविद्यालय रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी डॉ. आगाशे यांच्या हस्ते झाले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक सुनिल सुकथनकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, पी एम शाह फाऊंडेशन’चे अ‍ॅड.चेतन गांधी, लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक मुकुंद संगोराम, सा’ चे माजी अध्यक्ष अमृत बक्षी आणि सा’ चे अध्यक्ष अभय केले उपस्थित होते. याप्रसंगी मानसिक आरोग्य या विषयावर कोणकोणत्या माध्यमातून जनजागृती करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली.

डॉ. आगाशे म्हणाले, “ जगातील मतीमंद विद्यार्थ्यांसाठी काढलेल्या सर्व उत्तम आणि उत्कृष्टपणे चालणाऱ्या शाळा या त्यांच्या पालकांनी काढलेल्या असतात. व्यावसायिकांनी काढलेल्या अशा शाळा नीट चालत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सह- अनुभव. जो पर्यंत आपण मानसिकरित्या आजारी व्यक्तीची स्थिती जाणून घेणार नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी चांगले काम करू शकणार नाही.’’

सुकथनकर म्हणाले, “ चित्रपटांच्या प्रमुख प्रवाहात जेव्हा आम्ही ‘देवराई’ हा मानसिक आजाराविषयीचा चित्रपट बनवला तेव्हा मोठ्या प्रमाणात हा विषय लोकांप्रमाणे पोहचला असल्याचे आमच्या लक्षात आले. चित्रपटांच्या माध्यमातून आरोग्यविषयक विविध प्रश्न आपण दाखवू शकलो तर निश्चितच त्याचा परिणाम अधिक होईल. त्यासाठी लघुचित्रपट हे माध्यम अतिशय स्वागतार्ह आहे. मात्र या माध्यमातून जे काही सांगायचे आहे ते, जास्तीतजास्त अभ्यासपूर्ण, कलात्मक आणि योग्यप्रकारे लोकांपर्यंत पोहचवले जाईल याची काळजी घेतली गेली पाहिजे.’’

अ‍ॅड.गांधी यांनी मानसिक आरोग्य या विषयात काम करण्यासाठी संवेदनशीलता असणे आवश्यक असून, या विषयावर काम करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले. तसेच समाजावर दृश्य माध्यमांचा प्रभाव अधिक पडत असल्याचे सांगत मानसिक आरोग्य या विषयावर चित्रपट, माहितीपट या माध्यमातून जे काही करता येईल, त्यासाठी संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

संगोराम यांनी माध्यामातून मानसिक आजार या विषयावर लेखन होणे ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे सांगत मानसिक आरोग्य या विषयाचा एकूणच विस्तार बघता समाजातून आणखी काही दात्यांनी मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त केली.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात केले यांनी संस्थेच्या ‘मनमंदिरा’ व इतर जनजागृतीपर उपक्रमांबाबत माहिती दिली. तसेच स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्ती अर्थात शुभार्थींसाठी कामशेत जवळ लवकरच निवासी प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे जाहीर केले. विनया देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महोत्सवात पहिल्या सत्रात मानसिक आजार व आरोग्य या विषयावरील ११ लघुपट दाखविण्यात आले. असून, दुसऱ्या सत्रात ‘सा’ निर्मित ‘देवराई’ या राष्टीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाचे विशेष प्रसारण करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading