Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

जात्यावरील ओव्यांमधून उलगडले ग्रामीण भागातील महिलांचे अंतरंग

पुणे : महाराष्ट्रात मौखिक परंपरेने चालत आलेल्या जात्यावरच्या ओव्या या ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी आपल्या भावना, संवेदनशीलता, कलात्मकता, विचार, तत्त्वज्ञान यांवर चर्चा करण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ होत्या आणि यांमधूनच ग्रामीण भागातील महिलांचे अंतरंग उलगडण्यास मदत होते, असे प्रतिपादन ‘पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’ अर्थात पारी या संस्थेच्या सह-संस्थापिका व व्यवस्थापकीय संपादिका नमिता वाईकर यांनी केले.

पुण्यातील ग्योथ इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन आणि झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने कुडजे गावातील झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय येथे आयोजित क्रिटिकल झोन्स प्रदर्शनाअंतर्गत जात्यांवरील ओव्या यांवरील कार्यशाळा पार पडली त्यावेळी वाईकर बोलत होत्या. जात्यावरील या ओव्यांवर अधिक संशोधन झाल्यास महिलांची परिस्थिती, विचार व अपेक्षा समजून घेण्यास मदत होईल असेही वाईकर यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणीय बदलाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांविषयी ‘पारी’ने केलेल्या संशोधनात्मक विश्लेषणाची काही उदाहरणे देत वाईकर पुढे म्हणाल्या, “ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने काही उपक्रम करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा या महिला फार बोलत नव्हत्या. थोडी आणखी माहिती घेतल्यावर महिला आपले म्हणणे, व्यथा, अनुभव हे ओव्यांतून मांडत असल्याचे समोर आले. ही पद्धत पिढ्यानपिढ्या जोपासली गेली असल्याने महिला विचारी आहेत आणि आपली आजूबाजूची परिस्थती, अनुभव, तत्त्वज्ञान जपत असल्याचे अनुभवायला मिळाले. या जात्यांवरील ओव्यांचा नीट अभ्यास केल्यास स्त्रिया व समाजातील त्यांचे दैनंदिन जीवन, पितृसत्ताक पद्धती, जात, कवी-संत, विठ्ठल, वारी, सीतेची कहाणी, ऐतिहासिक घटना, बाबासाहेब आंबेडकर असे त्यांच्या ओव्यांचे विषय असल्याचे समोर आले. त्यामुळे जात्यावरील ओव्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न व विचार जाणून घेण्यासाठीचे ते एक महत्त्वाचे साधन ठरेल असा माझा विश्वास आहे .”

पारी संस्थेने आजवर ७३ हजार ओव्या संकलित करून त्यांचे शब्दांकन केले असून ते करण्यासाठी मदत करणारे जितेंद्र मैद म्हणाले, “ग्रामीण भागातील महिला या अशिक्षित नाहीत याचा प्रत्यय या संपूर्ण प्रक्रीयेमध्ये आम्हाला आला. त्यांचे विचार तत्त्वज्ञानाने भरलेले आहेत शिवाय त्यांना आजूबाजूची सामाजिक, राजकीय परिस्थितीची जाण देखील आहे हे आम्हाला समजले. मराठी बोलीभाषेतील अनेक अपरिचित शब्द आम्हाला येथे सापडले, शिवाय वनस्पती, शेतीच्या पद्धती, व्यक्तीचरित्रे, निसर्गाबद्दलची त्यांची धारणा, बाळाची पोटात होणारी वाढ, नक्षत्रे या संदर्भात नवी माहिती आम्हाला या महिला म्हणत असलेल्या ओव्यांमधून मिळाली.”

आज देशातील ६५ टक्के जनता ही ग्रामणी भागात राहते. भविष्यात विकासाच्या दृष्टीने अथवा ग्रामीण महिलांसाठी धोरणे आखताना या गोष्टींचा विचार केल्यास त्याचा फायदा या महिलांना आणि पर्यायाने समाजाला होईल असा विश्वास मैद यांनी व्यक्त केला.

फोटो, व्हिडिओ आणि गाण्यांसह मल्टिमीडिया स्टोरीज यांद्वारे जात्यावरील ओव्यांचे प्रात्यक्षिक वायकर यांनी या वेळी उपस्थितांना दाखविले. रेणू जामगावकर यांनी प्रास्ताविक करीत आभार प्रदर्शन केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading