fbpx

मोर्चे, आंदोलन व सभांसाठी राज्यकर्त्यांना लागते तरुणाईतील ‘रॉ मटेरियल’ – सुषमा अंधारे

पुणे : राजकारणापेक्षा टिपेला पोहोचलेली महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारीकडे वाढत जाणारा तरुणाईचा कल, हे महत्वाचे आहे. राज्यकर्त्यांना रॉ मटेरियल लागते, त्यांच्या मोर्चे, आंदोलन व सभांसाठी. जर सगळ्याच मुलांना नोक-या लागल्या, तर राज्यकर्त्यांकडे रॉ मेटेरियल म्हणून कोण जाईल? त्यामुळे ते रॉ मटेरियल करु इच्छितात. त्यामुळे हे रॉ मटेरियल होऊ नका, असे आवाहन शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या उपनेत्या अ‍ॅड. सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे मंडईतील बुरुड आळी येथे १०० कष्टकरी व्यावसायिकांना जंबो छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गील्ल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, म्हसोबा ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, सारिका निंबाळकर आदी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माणिक चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वेंकिग उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अ‍ॅड.सुषमा अंधारे म्हणाल्या, कष्टकरी व संघर्षाच्या वारशातून आलेल्या माणसाला सुख- दु:ख कळतात. गेल्या काही महिन्यात महापुरुषांचा अवमान असेल, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडविणे असेल, जाणीवपूर्व खोडसाळपणा करणे, यागोष्टींमुळे सर्वसामान्य माणूस सैरभर होत चालला आहे. सर्वसामान्यांचे जगण्या-मरण्याचे जे प्रश्न आहेत, त्यावरुन लक्ष हटावे, याकरिता हे ठरवून चालले आहे. त्यावरुन न हालता, आपण प्रश्न विचारत राहूया, असे आवाहनही त्यांनी केले.

संदीपसिंग गील्ल म्हणाले, समाजामध्ये एकमेकांना हात देऊन मदत करणे महत्वाचे आहे. म्हसोबा ट्रस्टतर्फे कष्टकरी वर्गाला दिलेली ही मदत खूप महत्वाची आहे. प्रत्येकाने असेच कार्य करत रहायला हवे, असेही त्यांनी सांगितले. निवृत्ती जाधव म्हणाले, मंडईतील कष्टकरी व्यावसायिकांचे ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे, याकरिता हा उपक्रम घेण्यात आला. उत्तम प्रतीच्या १०० जंबो छत्र्या या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले. सुधीर साकोरे, योगेश निकम, सागर जाधव, उमंग शहा, दिनेश पिसाळ आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. करिश्मा शेख यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: