ज्येष्ठ लावणी गायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे निधन
मुंबई : आपल्या ठसकेबाज आवाजातील लावणीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी गायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे आज मुंबईतील फणसवाडी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने लावणीचा ठसकेबाज आवाज हरपल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होतेय. सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता मुंबईच्या मरीन लाईन्स इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
डोक्यावर पदर अन् मुखी ठसकेबाज लावणीचे बोल,अशी त्यांची प्रतिमा होती. ज्या काळात तमाशापटांना एक वेगळी उंची होती. सुलोचना चव्हाण यांची गायकी आणि जयश्री गडकरी यांचं सादरीकरण असे जणू समिकरच होते. सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 ला मुंबईतील गिरगावमध्ये झाला. त्यांनी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतले होते. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती नाटकांमध्ये त्यांनी बालकलाकाराच्या भूमिकाही केल्या. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गायकीला सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी मन्ना डे यांच्यासोबत भोजपुरी रामायण गायले होते. तर 1953 साली त्यांनी श्यामराव चव्हाण यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या आधी त्यांनी 70 हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं होतं. आचार्य अत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांच्या गायकीचा गौरव करताना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब त्यांना दिला होता.
सुलोचना चव्हाण यांच्या गाजलेल्या लावण्या –
तुझ्या उसाला लागेल कोल्हा…
पाडाला पिकलाय आंबा
फड साभांळ तुऱ्याला गं आला
मला म्हणत्यात पुण्याची मैना
पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा
कसं काय पाटील बरं हाय का?
