fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsPUNE

महापारेषणच्या वीजयंत्रणेतील बिघाडामुळे पिंपरी चिंचवडसह शिवाजीनगर परिसरातील बत्तीगुल

पुणे : महापारेषण कंपनीच्या चाकण व लोणीकंद या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रातील यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी (ता. ९) सकाळी पावणे दहानंतर पिंपरी चिंचवड शहरासह शिवाजीनगर, औंध, बाणेर, बालेवाडी, गणेशखिंड परिसरात ४५ मिनिटांपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. तर चाकण एमआयडीसी व लगतच्या गावांमध्ये दीड तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होता.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण व लोणीकंद अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. यामुळे महापारेषणच्या २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही भोसरी एक व दोन, २२० केव्ही टेल्को, १३२ केव्ही रहाटणी व १३२ केव्ही एनसीएल व गणेशखिंड या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे महावितरणच्या उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद पडला. मात्र महापारेषणकडून तातडीने तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्याने या सर्व उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर महावितरणकडून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

या दरम्यान पिंपरी विभाग अंतर्गत पिंपरी व चिंचवड परिसर, हिंजवडी, खराळवाडी, सांगवी या परिसरात सुमारे पाऊण तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. तर भोसरी विभाग अंतर्गत आकुर्डी, बी-ब्लॉक, थॅरमॅक्स चौक, भोसरी, जाधववाडी, कुदळवाडी, चिखली, देहूगाव, तळवडे या परिसरात सुमारे ४० मिनिटे तर भोसरी एमआयडीसी, इंद्रायणीनगर, भोसरी गावठाण, एस व ए ब्लॉक, चऱ्होली, डुडुळगाव, नाशिक रोड या परिसरात ११ ते २० मिनिटांपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. तसेच शिवाजीनगर विभाग अंतर्गत शिवाजीनगरचा काही भाग, गणेशखिंड, औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात देखील सुमारे २० ते ३० मिनिटे वीजपुरवठा बंद राहिला.

यासोबतच राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकण एमआयडीसीला वीजपुरवठा करणाऱ्या ४००/२२ केव्ही, २२०/२२ केव्ही, १३२/३३/२२ केव्ही व २२०/३३ केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसी व लगतच्या काही गावांमध्ये सुमारे सव्वा ते दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये चाकण एमआयडीसीच्या काही भागात नारायणगाव अतिउच्चदाब उपकेंद्रातून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: