छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सर्व धर्मिय शिवप्रेमी पुणेकरांच्या वतीने येत्या १३ डिसेंबर २०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संविधानिक पदावर असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील काही मंत्री वाचाळवीराप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करून इतिहासात नोंद नसलेल्या गोष्टींचा दाखला देऊन बदनामीकारक वक्तव्य करीत आहेत. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान हे मूग गिळून बसले आहेत. हा देखील एक प्रकारे या राष्ट्रपुरुषांचा अपमानच आहे.
पुणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी व महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी आहे. पुणेकर म्हणून या राष्ट्रपुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या वाचाळ वीरांना योग्य तो संदेश देण्यासाठी सर्वधर्मिय शिवप्रेमी पुणेकर म्हणून मंगळवार दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी पुणे बंदचे आवाहन आम्ही करीत आहोत.
या दिवशी सकाळी १०.०० वा., डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा पुढे खंडोजीबाबा चौक – टिळक चौक – लक्ष्मी रोडने बेलबाग चौक डाव्या हाताने लाल महाल येथे सभेने समारोप होणार आहे.
या पुणे शहर बंदमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा, मुस्लिम संघटना, मागासवर्गीय संघटना, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, गणेश मंडळ, व्यापारी संघटना, शैक्षणिक संघटना, मराठा संघटना, मार्केटयार्ड मधील सर्व संघटना, रिक्षा संघटना, तालिम संघ, माथाडी कामगार संघ, वकील संघटना, क्रीडा संघटना, बँक असोसिएशन, कामगार युनियन, राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, एम. आय. एम., जनता दल, वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहिर केला आहे. तसेच या सर्व संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.