‘क्लीन स्वीप’ टाळण्यासाठी शेवटच्या लढतीत भारतीय संघाला विजयाची गरज
कुलदीप यादवचे भारतीय संघात पुनरागमन
ढाका : भारतीय संघाने बंगलादेश विरुद्धची मालिका गमावली असून क्लीन स्वीप टाळण्यासाठी भारतीय संघाला विजयाची गरज आहे. त्यातच कर्णधार रोहित शर्मा देखील जायबंदी झाल्याने कुलदीप यादवने भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
दुसऱ्या लढतीमध्ये फिल्डिंग करताना रोहित शर्माचा हाताला जखम झाली होती. त्यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर रोहित शर्मा थेट मुंबईमध्ये परतला आहे. रोहित शर्माच्या बरोबरीने वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला देखील पाठीच्या दुखण्याचा त्रास सुरु झाला आहे. त्यामुळे तो पुढील लढतीत देखील मैदानावर उतरण्याची शक्यता कमी आहे. भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज दीपक चाहर देखील दुखापतीने त्रस्त आहे. कुलदीप सेन व दीपक चाहर हे दोघेही एनसीए मध्ये रिपोर्ट करणार आहेत. त्यामुळे शेवटच्या लढतीसाठी हे तीनही खेळाडू अनफिट असल्याने मैदानावर उतरणार नाहीत.
कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व के. एल. राहुल करणार असून किमान शेवटच्या लढतीत विजय मिळविण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असणार आहे. परंतु कुलदीप यादवच्या संघात सामील होण्याने भारतीय गोलंदाजीला धार येण्याची शक्यता आहे. संघातून वगळण्यापूर्वीच्या लढतीत कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १८ धावत ४ गडी बाद करताना सामानावीराचा पुरस्कार मिळविला होता.