fbpx

राज्यपाल भगतसिंग कोशारींच्या निषेधार्थ सांगवीत काँग्रेस- शिवसेना- मनसेचे आंदोलन

पिंपरी : राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली सांगवी, पिंपळे गुरवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसेने रॅली काढत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा जाहीर निषेध केला. तसेच ‘राज्यपाल हटावा…’ च्या घोषणा दिल्या.
          सांगवी, नवी सांगवीत व्यापाऱ्यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली दुकाने, व्यवसाय बंद ठेवले. तर पिंपळे गुरवमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
         राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसेने काढलेल्या रॅलीला राजेंद्र जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरुवात झाली. पिंपळे गुरवमधील सृष्टी चौक, कल्पतरू सोसायटी, राजमाता जिजाऊ उद्यान, काटेपुरम चौक, नवी सांगवीतील कृष्णा चौक, साई चौक, जुनी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्र चौक, शितोळेनगर मार्गे रॅली राजमाता अहिल्याबाई होळकर पुतळा येथे समाप्त झाली. यावेळी राज्यपाल कोशारी यांचा जाहीर निषेध केला गेला.
        या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष श्याम जगताप, उपाध्यक्ष तानाजी जवळकर, शिवसेनेचे विजय साने, सिकंदर पोंगडे, गोरबंजारा समाज संघटनेचे अध्यक्ष संदीप राठोड, प्रदीप गायकवाड, साहेबराव तुपे, सुरेश सकट, बाळासाहेब पिल्लेवार, चेतन शिंदे, बाळासाहेब सोनवणे, मोहन बारटक्के, अभिषेक जगताप आदींसह व्यापारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: