fbpx

समाजकल्याण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करा सुनील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे  : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज विकास या योजनेत अंतर्गत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध वस्तीतील लोकांसाठी पुस्तके खरेदी करण्यात येत आहेत, मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ई मेल द्वारे पाठवले आहे.
या पत्राद्वारे त्यांनी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज विकास या योजनेत सुधारणा करून २०१८ पासून प्रत्येक जिल्ह्यास ०१ कोटी याप्रमाणे ३६ कोटी रुपयांची पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. शासनाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या या २१० पुस्तकांच्या यादीतील अनेक पुस्तकांचा अनुसूचित जाती नवबौद्ध वस्तीतील लोकांना सध्या उपयोग होत नाही. त्याचबरोबर या पुस्तकांची किंमत ही अवाजवी आहे.
समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी ५ जुलै २०२२ रोजी आदेश काढून मेसर्स शब्दलाय पब्लिकेशन अहमदनगर कडून २१० पुस्तकांचा संच ९९७५०/ – रुपयात खरेदी करून पुरवठा करण्याचे निर्देश दिलेत. यामध्ये अनेक पुस्तकांच्या किमती वाढवून लावण्यात आल्या आहेत. उदा, आता होऊन जाऊ द्या या लोकनाथ यशवंत यांच्या कविता संग्रहाची मूळ किंमत १०० रुपये आहे. मात्र शासनाच्या यादीमध्ये या पुस्तकाची खरेदी किंमत ६८४ रुपये आहे. त्याचप्रमाणे आणि शेवटी काय झाले ? या पुस्तकाची मूळ किंमत ८० रुपये आहे. मात्र समाज कल्याण विभाग हे पुस्तक ३१२ रुपयांना खरेदी करत आहे. म्हणजेच मूळ किमतीपेक्षा जवळपास ६ पट अधिक दराने समाजकल्याण ही पुस्तके खरेदी करत आहे. एवढी तफावत कशी काय असू शकते?
या उदाहरणातून पुरवठादाराच्या हितासाठी ही योजना राबवत असल्याची संशय निर्माण होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेली ही योजना प्रामाणिकपणे राबवणे आवश्यक आहे. याबाबत चौकशी करून अशाप्रकारे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यां विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: