fbpx

दत्तजन्म सोहळयात दुमदुमला दत्तनामाचा जयघोष

पुणे : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या गजरात आणि शेकडो भाविकांच्या गर्दीने फुललेल्या दत्तमंदिरामध्ये दत्तजन्म सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे यांच्या कीर्तनानंतर झालेला नेत्रदीपक दत्तजन्म सोहळा डोळ्यात साठविण्याकरीता भाविकांनी मोठी गर्दी केली. दत्तगुरुंच्या जयघोषाने दुमदुमलेला श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर भक्तीमय झाला होता. मंदिराच्या १२५ व्या दत्तजन्म सोहळ्यानिमित्त कळसापासून पायथ्यापर्यंत आणि प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत अशी फुलांमधील आकर्षक मयूर महालाची आरास व विद्युतरोषणाईने सजावट करण्यात आली.

सोन्याचा अंगरखा, पितांबर व मणिकांचन हार परिधान केलेल्या दत्तमहाराजांच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. बुधवारी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी श्री दत्तजन्म सोहळा झाला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करुन दिगंबरा, दिगंबरा… असा जयघोष करण्यात आला. दत्तगुरुंच्या पादुकांची भव्य पालखी नगरप्रदक्षिणा मंदिरातून वाजत-गाजत निघाली. नगरप्रदक्षिणेत घोडे, उंट, विद्युत छत्र्यांसह बँड, रुद्र ढोल ताशा पथक आणि दत्तमहाराजांच्या पादुका ठेवलेली पारंपरिक बग्ग्गी पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती.

दत्तमंदिरापासून निघालेली पालखी रामेश्वर चौक, टिळक पुतळा मंडई, शनिपार, अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मार्गे मंदिरात आली. कर्नाटक संकेश्वर पीठाचे प.पू. सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी ह्रदयरोगतज्ञ डॉ. ॠतुपर्ण शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ संस्थान, अखिल मंडई मंडळ, देसाई बंधू आंबेवाले यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. दगडूशेठ गणपती मंदिरात पालखी आगमनानंतर आरती देखील झाली. यावेळी गणपती ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.

त्यापूर्वी बुधवारी सकाळी ६.३० वाजता ट्रस्टचे विश्वस्त अक्षय हलवाई व कुटुंबियांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर ट्रस्टचे विश्वस्त राजू बलकवडे, हेमलता बलकवडे, आर्य बलकवडे हस्ते श्री दत्तयाग झाला. सकाळी ८.३० वाजता प्रात: आरती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.पांडुरंग व वर्षा थोरवे यांच्या हस्ते तसेच दुपारी १२.३० वाजता राजकुमार चोरडिया व कुटुंबिय आणि डॉ. पी.डी.पाटील हस्ते माध्यान्ह आरती झाली. यावेळी शल्यविशारद डॉ.रविंद्र कसबेकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उत्सवमंडपात स्वहस्ते अभिषेकाचा भाविकांनी लाभ घेतला.

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे यांनी कीर्तनातून दत्तजन्माची कहाणी आणि दत्तगुरुंचे महात्म्य सांगितले. भक्तांसाठी सकाळी ६ पासून मंदिर खुले करण्यात आले असले तरी रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

  • मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
    शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन गुरुवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३ यावेळेत मंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आले आहे. यामध्ये वजन, रक्तदाब, रक्त शर्करा, दंतचिकित्सा, मौखिक कर्करोग, नेत्र चिकित्सा आदी तपासण्या होणार आहेत. तरी पुणेकरांनी शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: