नव्या पिढीसमोर समाजसुधारकांचे कार्य आणि आजच्या काळाची सांगड घालण्याचे आव्हान – सतीश आळेकर
पुणे: रोजच्या जगण्यातील धर्माचा कर्मठपणा नाहीसा व्हावा, यासाठी एकोणिसाव्या शतकात सुधारकांनी ब्राह्मो, सत्यशोधक, आर्य, प्रार्थना समाज यांची स्थापना केली. त्याउलट आजच्या काळात २०१४ पासून धर्माची आठवण अधिक तीव्रतेने करून दिली जात आहे. अशावेळी समाजसुधारकांचे कार्य आणि आजच्या काळाची सांगड घालण्याचे आव्हान नव्या पिढीसमोर आहे, असे मत पुणे विद्यापीठाच्या ललित कला कला केंद्राचे माजी विभाग प्रमुख , ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस १५२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त समुद्रीय कासवांचे परिरक्षण व संवर्धन यामधील कामगिरी करिता चिपळूणचे भाऊ काटदरे यांना ‘डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेदांच्या अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी वीस वर्षे काम करणाऱ्या हैदराबादच्या बंदा रवीशंकर यांना ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ पुरस्कार देण्यात आला. दि पुना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड ट्रस्ट या संस्थेला ‘डेव्हिडा रॉबर्ट पुरस्कार देण्यात आला. आळेकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग उपस्थित होते.
सतीश आळेकर म्हणाले, समाजसुधारकांना त्यांच्या काळामध्ये संस्था स्थापन करण्याची गरज वाटली. त्यामागे नेमकी कोणती कारणे असावीत. धर्मातील कर्मठपणा दूर व्हावा, तो अधिक व्यापक व्हावा; समता आणि नैतिकता स्थापन व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा आता इतिहासाचा भाग झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात या गोष्टींची पुन्हा आठवण करून दिली जावी, असे वातावरण तयार होत आहे. सध्याच्या काळात इतिहासाविषयी बोलणेही अवघड झाले आहे. भाऊ काटदरे यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्विकारला.
१८२६ ते १८७६ या काळात समाजसुधारणांचे वातावरण तयार होत असतानाच नाट्यकला मध्यमवर्गीयांसमोर एका वेगळ्या रुपात विष्णुदास भावे यांनी उभी केली. मात्र, या नाट्यकलेचा संदर्भ आज विचारात घेतला जात नाही. पण तो समाजाचा आरसा होता. धर्मसुद्धा समाजाचा आरसा आहे. मात्र, त्यातील काही संदर्भ जपावे लागतात, काही काळानुसार बदलावे लागतात. त्या बदलांचे आव्हान आजच्या काळात मोठे आहे. त्याला नवी पिढी कोणती उर्जा घेऊन सामोरी जाणार आहे, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे.
सुषमा जोग म्हणाल्या, वेगवेगळ्या कारणांनी विभक्त झालेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुधारकांनी केले. मात्र, मतपेटीच्या राजकारणाने समाजात मूलभूत सुधारणावादी तत्वे रुजण्याऐवजी कर्मठपणा वाढण्यास मदत केली आहे. अशावेळी प्रार्थना समाजाची ज्योत तेवत राहिली पाहिजे. त्यासाठी प्रार्थना समाजाकडून मानवीकरण, एकीकरण, अध्यात्मिकरण, विज्ञानवादी विचारांचे अनुसरण आणि धार्मिक कार्य ही पाच तत्त्व रुजविण्याचे कार्य अखंड सुरू राहिल.
