fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

संस्कारक्षम जीवन शिक्षणानेच नवे आदर्श उभे राहतील – डॉ. अरुणा ढेरे

पुणे:सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या काळात खरे आयुष्य जगवणारी संस्कारक्षम शिक्षण व्यवस्था निर्माण करायला हवी, तरच नवे आदर्श उभे राहतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी आज येथे केले. श्रीमती भारती ठाकूर लिखित व साप्ताहिक विवेक प्रकाशित “गोष्ट नर्मदालयाची” या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. सुप्रसिद्ध निरुपणकार धनश्री लेले, विवेकच्या कार्यकारी संपादिका अश्विनी मयेकर, विवेकच्या पुणे शहराचे पालक बापूराव कुलकर्णी, लेखिका ठाकूर व्यासपीठावर उपस्थित होत्या.

डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या की, सद् विचारांची इच्छा असलेल्या चांगल्या लोकांची साखळी उभी करायला हवी. त्यासाठी १२ वर्षांपूर्वी भारती ठाकूर यांनी स्वतःला झोकून दिले. भारती ठाकूर यांनी आपली सुखाची नोकरी सोडून दिली आणि मध्यप्रदेशात नर्मदेच्या काठावर शिक्षणाची एक आगळीवेगळी व्यवस्था उभी केली आहे. सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देत त्यांनी तब्बल १५ गावांमध्ये आज शाळा सुरू केल्या आहेत, ज्यात सुमारे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खरे आयुष्य जगवणारी, संस्कार देणारी आणि व्यावहारिकतेचे धडे देणारी नवीन शिक्षण पद्घती त्यांनी निर्माण केली आहे. व्यसनांपासून मुलांना बाहेर काढत अत्यंत जिद्दीने त्यांनी निर्माण केलेल्या शाळा म्हणजेच हे नर्मदालय आहे.

श्रीमती लेले यांनी देखील भारती ठाकूर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडला. नाशिक येथून नर्मदा परीक्रमेसाठी निघालेल्या सामान्य स्त्रीने आपले आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेत संन्यास घेत कर्मयोगीनी व्रत अंगिकारलेले आहे, ही सर्व चित्तधरारक कहाणी जरूर वाचावी अशी या पुस्तकात मांडलेली आहे.

भारती ठाकूर यांनी गेल्या १२ वर्षातील प्रवासात विविध सज्जनशक्तींची साथ लाभल्याचे कृतज्ञतेने व्यक्त केले. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय हे काम सुरू आहे आणि ग्रामीण भागातील ही मुले आज व्यवहारिक जीवन शिकत शिकत आदर्श नागरिक होण्याच्या मार्गावर आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयेकर यांनी केले तर पुस्तक विभागाच्या प्रमुख शीतल खोत यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा नातू यांनी केले. श्वेता नातू यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading