fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, आत्मसमर्पण उंचावणारा ग्रंथ म्हणजे गीता – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

पुणे : माणसाने जीवन कसे जगावे, याची दिशा श्रीकृष्णाने गीतेतून दिली आहे. मानवी जीवनाचा सदुपयोग करण्याचे मार्गदर्शन गीतेमध्ये करण्यात आले आहे. माणसामधील आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसमर्पण उंचावणारा तसेच ते मानवाला शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. त्यामुळे गीता आपण आपल्या जीवनात आचरणात आणायला हवी, असे मत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.

गीता परिवार पुणे शाखेच्या वतीने गीता जयंती निमित्त गणेश कला क्रीडा येथे स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान सोहळा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ.संजय मालपाणी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.शां.ब.मुजुमदार, सुधीर मांडके, बापूजी पाडळकर, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, विश्वस्त सुनील रुकारी, गीता परिवारच्या संतोषी मुंदडा, लक्ष्मण जोशी, अंजली तापडीया, सत्यनारायण मुंदडा, प्रदीप राठी ,शाम मणियार, विद्या म्हात्रे ,नरेन्द्र कोटक आदी उपस्थित होते.

उत्सवात ९२ वर्षीय दादा जोशी यांना योग क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल स्वामी विवेकानंद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शिंदेशाही पगडी, महावस्त्र, पुष्पमाला व ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी डॉ. संजय मालपाणी यांचे जानो गीता – बनो विजेता या विषयावर व्याख्यान देखील झाले.

स्वामी गोविंददेव गिरि महाराजांनी या प्रसंगी गीता परिवारातर्फे चालवल्या जाणा-या लर्न गीता या विश्वव्यापी उपक्रमाची प्रशंसा केली. बारा भाषांमधून चालणा-या या प्रकल्पात १३६ देशातील पाच लाख लोक सहभागी झाले आहेत. आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांना वाटण्यात जीवनाचे सार्थक असते. म्हणूनच या उपक्रमासाठी वेळ देणा-या गीता परिवाराच्या सुमारे पाच हजार प्रशिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.

डॉ.संजय मालपाणी म्हणाले, गीता हे केवळ भक्तीचे शास्त्र नसून व्यवस्थापन, मानोविज्ञान, युद्धशास्त्र आणि योगशास्त्राची शिकवण देणारा ग्रंथ आहे. गीता हा ज्ञान आणि विज्ञानाचा ग्रंथ असल्याने पाच हजार वर्षांनंतर आजही तो सार्थक आह. संवाद आणि सुहास्य हे जिंकण्याचे मार्ग आहेत, असे गीता सांगते. त्यामुळे तो एक संवादग्रंथ म्हणून देखील परिचित आहे. धर्माची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. मात्र, धर्म म्हणजे कर्तव्य ही व्याख्या गीतेमध्ये अधिक व्यापकतेने दिली आहे. गीता हे धर्मशास्त्राचे सर्वोत्तम पुस्तक असून यशस्वीतेचे अनेक मंत्र या पुस्तकात प्राप्त होतात असे  त्यांनी सांगितले. दादा जोशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी गीता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांसह सर्वांनीच पारंपरिक वेशात सहभाग घेतला. संगिता मणियार यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading