Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

श्रद्धा सुमन कार्यक्रमात रसिकांनी अनुभवली गायन आणि वादनाची पर्वणी

पुणे  : डॉ. प्रमोद गायकवाड व त्यांच्या कन्या नम्रता गायकवाड या सनईवादक पिता – पुत्रीने सादर केलेला अनोखा कलाविष्कार…पं. राजेश आणि पं. रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सुरेल गायन आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. स्वपन चौधरी व पं. कुमार बोस यांचे दमदार तबलावादन अशा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी कला रसिकांनी अनुभविली. निमित्त होते श्रद्धा सुमन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.

सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल या संस्थेच्या वतीने तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत ‘श्रध्दा सुमन’ या दोन दिवसीय विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची सांगता पं. कुमार बोस यांच्या तबला वादनाने झाली.

कार्यक्रमात पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ. प्रमोद गायकवाड आणि नम्रता गायकवाड यांचे सनईवादन झाले. त्यांनी राग यमनद्वारे आपल्या सादरीकरणास सुरवात केली. त्यानंतर कधी हळुवार तर कधी दमदार सनईवादन सादर करत त्यांनी कार्यक्रमात रंगत भरली. त्यांच्या सनई जुगलबंदीला रसिकांनी टाळ्यांच्या उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात नितीन दैठणकर, चेतन साळुंखे, रवी गुरू ( तबला) यांनी साथसंगत केली.

दुसऱ्या सत्रात पं. स्वपन चौधरी यांचे तबलावादन झाले. त्यांनी आपल्या वादनाची सुरवात तीनतालद्वारे केली. त्यानंतर लखनौ घराणा शैलीतील वादन, वेगवेगळ्या जातीतील कायदे, त्यांच्या हाताची ‘धिर धिर’ या शब्दांची जादुई तयारी यावेळी रसिकांना अनुभवायला मिळाली. उस्ताद अफाक हुसैन खान यांची रचना, उस्ताद वाजिद हुसैन खान यांची रचना, अनागत, दहेज गत, झुलना छंद’चे सादरीकरण त्यांनी केले. चक्रदार सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना धर्मनाथ मिश्र यांनी संवादिनीवर साथ दिली.

कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात पं. रितेश व पं. रजनिश मिश्रा यांच्या गायनाद्वारे झाली. त्यांना निषाद व्यास व माधव लिमये यांनी तानपुऱ्यासाठी, सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीसाठी तर पं. अरविंद कुमार आझाद यांनी तबल्यावर साथ केली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग श्री’द्वारे केली. त्यामध्ये मध्यलय झपतालमध्ये ‘प्रभू के चरण कमल’  आणि दृतलय एक ताल मध्ये ‘अब मोरी बाही गहो’ या रचना त्यांनी सादर केल्या. त्यानंतर राग मालश्री या केवळ तीन स्वर असलेल्या रागाचा व्यापक विस्तार करत ‘ नैनन मे अब आन बसो ‘ ही समर्पक बंदिशी त्यांनी सादर केली. ‘ साध रे मन सुर को साध रे ‘ या भजन सादरीकरणाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या सत्रात सुप्रसिद्ध तबलावादक पं. कुमार बोस यांचे सोलो तबलावादन झाले. तीनतालद्वारे त्यांनी आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी उठान, औचार, कायदा, विविध जातीतील रेला आणि बाँट, पं. किशन महाराज यांच्या रचना, पं. भैरव सहाय यांच्या रचना, सवाल – जवाब, तिहाई यांचे दमदार सादरीकरण केले. त्यांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना पं. धर्मनाथ मिश्रा यांनी संवादिनीवर साथसंगत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिल देवधर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading