जपानी कलाकारांचे सादरीकरण ठरणार ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ महोत्सवाचे वैशिष्ट्य
पुणे : जपानी व भारतीय कलेचा सांस्कृतिक मेळा अनुभविण्याची संधी पुणेकर नागरिकांना येत्या शनिवार- रविवार म्हणजेच दि. १९ व २० नोव्हेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. निमित्त आहे विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी येथे इंडो जपान बिझनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी आणि जपान सरकारचे कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे. सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून जपानी व भारतीय कलांचा अनोखा आविष्कार येथे अनुभविता येणार आहे. जपानी कलाकारांचे सादरीकरण हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य असेल, अशी माहिती आयजेबीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख यांनी दिली.
भारत- जपान सबंध हे सौदार्ह्यपूर्ण आहेतच मात्र तरीही दोन्ही संस्कृतींमध्ये आदानप्रदान व्हावे आणि पर्यायाने व्यापार, व्यवसाय, शिक्षण यांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने येत्या १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. त्यापैकी दोन दिवस दुपारी ३ वाजल्यापासून सदर सांस्कृतिक महोत्सव फिनिक्स मार्केटसिटी येथे पार पडेल.
महोत्सवाच्यानिमित्ताने अकिको कातो या जपानी योग तज्ज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, अकिको या स्वत: किओ विद्यापीठामध्ये एन्व्हार्नमेंट अँड इन्फर्मेशन स्टडीज विभागाच्या व्याख्यात्या असून २०१५ साली मिस वर्ल्ड जपान स्पर्धेत विशेष पारितोषिक विजेत्या देखील आहेत. त्यांनी आजवर योग तज्ज्ञ म्हणून जपानी संरक्षण दलातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित केले आहे. शिवाय अनेक सरकारी अधिकारी-कर्मचारी व सुमो रेसलर्स यांनाही प्रशिक्षित केले आहे. ख्यातनाम संतूरवादक शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई यांचे सादरीकरण हे देखील महोत्सवाचा महत्त्वाचा भाग असणार आहे.
यानंतर संगीतकार आणि जपानी तबलावादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या नोरीको शक्ती यांचा कार्यक्रम होणार आहे. अभिजात भारतीय संगीताच्या प्रेमापोटी नोरीको या भारतात तबलावादनाचे धडे तर घेत आहेतच शिवाय संगीत क्षेत्रात वेगवेगळे उल्लेखनीय प्रयोग देखील त्या करीत असतात.
असानो फुकूई या कलाकारांचा जपानी सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम हे देखील महोत्सवाचे खास आकर्षण असेल. याद्वारे जपानी संस्कृती समजण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास आयोजकांना आहे. याबरोबरच जपानी गायिका, कवयित्री आणि नृत्यांगना असलेल्या हिरोको सारा या पहिल्या दिवसाचे आकर्षण असतील.
अभिजात शास्त्रीय कथक नृत्य शिकण्याच्या उद्देशाने भारतात आलेल्या सारा या कथक विशारद असून बनारस घराण्याच्या जयंतीमाला मिश्रा यांच्या शिष्या आहेत. विशेष म्हणजे सारा यांच्या गुरु या प्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु सितारादेवी यांच्या कन्या आहेत. गेल्या ९ हून अधिक वर्षे भारतात शिक्षण घेत असलेल्या हिरोको सारा या कथक सोबतच बॉलीवूड, राजस्थानी आणि बेले नृत्य यांमध्येही पारंगत आहेत.
महोत्सवादरम्यान टीम मिस्टिक जॉनेत्सु या अंतर्गत कुश्मीर, अबेक्स आणि हिरोको सारा हे एक जपानी – भारतीय फ्युजन सादरीकरण करणार आहेत.
‘शोडो’ या सुप्रसिद्ध जपानी सुलेखन पद्धतीच्या तज्ज्ञ असलेल्या कजुको बरिसिक यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिक महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असेल. जगप्रसिद्ध जपानी टी सेरेमनी विषयी आपण सर्वांनीच ऐकले असेल कजुको बरिसिक या टी सेरेमनी मास्टर असून या पारंपरीक जपानी टी सेरेमनी विषयी देखील अधिक माहिती त्या उपस्थितांना देतील. गेली वीसहून अधिक वर्षे बरिसिक या जगभरात सुलेखन व टी सेरेमनी या विषयांची माहिती देत आहेत हे विशेष.
यानंतर फुमी नेगिशी यांचा भारतीय संगीतावर आधारिक कार्यक्रम होईल. नेगिशी या भारतीय शास्त्रीय संगीताच्या आवडीने १९९७ साली भारतात आल्या होत्या. २०१५ पासून इंडियन काउंसिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) शिष्यवृत्ती अंतर्गत त्यांनी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गुरु डॉ. प्रभा अत्रे यांकडे संगीताचे शिक्षण घेतले आहे. शिवाय डॉ. अत्रे यांच्या ‘एन्लायटनिंग दी लिसनर’ या पुस्तकाचे जपानी भाषांतर देखील त्या करीत आहेत.
याबरोबरच महोत्सवात ओरिगामी, जपानी पारंपरीक पोषाख, फुलांची जपानी पद्धतीने सजावट करण्याची कला असलेली इकेबाना, जपानी कपडे परिधान करण्याची किमोनो पद्धती, बॉन ओडोरी हा जपानी पारंपरिक समर फेसिव्हल आणि कॉस प्ले यांसारखे कार्यक्रम असणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच खाद्यमहोत्सव, आर्ट कॉर्नर हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल.
