Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

मूर्खपणाचा शिकारबंदी कायदा रद्द करावा – डॉ. माधव गाडगीळ

पुणे – पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी करीत असतात. भ्रष्ट वनविभागाच्या जाचक कायद्यांनी पर्यावरणाचे वाटोळे झाले आहे. लाचखोर सरकारी यंत्रणेमुळे पर्यावरणाच्या समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. निसर्गचक्रात बाधा निर्माण झाली आहे. शहरी निसर्गवाद्यांची भूमिकाही चुकीची आहे. आपला देश सोडल्यास जगाच्या पाठीवर कुठेही शिकार बंदीचा कायदा नाही. हा कायदा मूर्खपणाचा आहे, हा कायदा रद्द केला जावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, पद्मभूषण डॉ. माधवराव गाडगीळ यांनी आज केली. पर्यावरणासंदर्भातील आपण दिलेले अभ्यासपूर्ण अहवाल नाकारले गेले याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
ॲड-व्हेंचर फाउंडेशन, पुणे या संस्थेतर्फे 15 वा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार डॉ. गाडगीळ यांना आज एस. एस. जोशी फाउंडेशन सभागृहात प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. गोवा स्टेट बायोडायर्व्हसिटी बोर्डचे अध्यक्ष राजेंद्र केरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. शाल आणि मानपत्र देऊन डॉ. गाडगीळ यांचा सन्मान करण्यात आला. गंगोत्री होम्स ॲण्ड हॉलिडेजचे संचालक मकरंद केळकर प्रमुख पाहुणे होते. फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे, सदस्य सुधीर कदम, अनिल गोहाड व्यासपीठावर होते.
वनविभागामुळे पर्यावरणाचे ज्या प्रकारे नुकसान होत आहे त्याच प्रमाणे प्रदुषण नियंत्रण मंडळही पर्यावरणारच्या नुकसानीस कारणीभूत आहे, असे सांगून कोकणातील वशिष्ठी नदीच्या प्रदुषणाविषयी डॉ. गाडगीळ म्हणाले, कोकणातील रासायनिक उद्योग विषारी वायू पाण्यात सोडत असल्याने तेथील मच्छिमारीचा उद्योग नष्ट होत आला आहे. पंचगंगा नदीच्या प्रदुषणाविषयीही त्यांनी टिप्पणी केली. प्रदुषण नियंत्रण मंडळ केवळ नावापुरते असून अर्थपूर्ण व्यवहारात आघाडीवर आहे. रासायनिक उद्योगांमुळे प्रदुषण होत असले तरी खोटी आकडेवारी देऊन प्रदुषण नियंत्रण मंडळे नागरिकांची दिशाभूल करीत आहे.
डॉ. सलीम अली हे पक्षीमित्र म्हणून खूप महान होते; परंतु त्यांचा परिसर अभ्यास नसल्याने त्यांनी चुकीचे सल्ले दिले अशी टीकाही डॉ. गाडगीळ यांनी केली. त्यांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे झालेल्या हानीचाही त्यांनी उहापोह केला. उपस्थितांच्या शंकांचे समाधान डॉ. गाडगीळ यांनी केले.
राजेंद्र केरकर म्हणाले, गोमंतकाच्या सुपुत्राचा माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या हस्ते सन्मान होणे हे मी माझे भाग्य समजतो. डॉ. गाडगीळांचे व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्याचा भाग बनले आहे. गोव्यातील माणसे जेथे जातात तेथे ते त्यांच्यातील हिरवी संवेदना जीवंत ठेवतात. पृथ्वी विनाशाकडे जात आहे, त्याची ओझी आता निसर्गप्रेमींनी वाहणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा केरकर यांनी व्यक्त केली. आपापसातील स्पर्धा आणि हाव यामुळे माणूस विनाशाकडे जात आहे. मारुती चितमपल्ली यांच्या लिखाणातून मी निसर्ग अनुभवला तर निसर्गाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टीकोन डॉ. गाडगीळ यांच्यामुळे माझ्या मनात निर्माण झाला, असेही ते म्हणाले.
मकरंद केळकर यांनी गंगोत्री होम्स ॲण्ड हॉलिडेजचे प्रकल्प निसर्गस्नेही करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे आवर्जून नमूद केले. ॲड-व्हेंचर समूहात गंगोत्री परिवाराला सामावून घेतल्याबद्दल त्यांनी संस्थेविषयी ऋण व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत रीमा देशपांडे, सुधीर कदम, मिलिंद देशपांडे यांनी केले. संस्थेच्या कार्याची ओळख अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी करून दिली तर सन्मानपत्राचे वाचन प्रतिभा देशपांडे यांनी केले. सन्मानपत्राचे लेखन पत्रकार प्रभाकर खोले यांनी केले आहे. सूत्रसंचालन गौतमी देशपांडे यांनी केले. मारुती चितमपल्ली यांचा संदेश गौतमी देशपांडे यांनी वाचून दाखविला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading