ऊस तोडणी वाहतुकदार कडून होणाऱ्या पिळवणूक विरोधात किसान संघाने उठवलेल्या आवाजाला यश
पुणे:महाराष्ट्रात सर्व ऊस उत्पादक जिल्ह्यात ऊस तोडणी व वाहतुकदार यंत्रणेकडून गेली अनेक वर्षे ऊस तोडणीसाठी प्रथम चहापाणी खुशाली नावाने पैशाची अवैध मागणी सुरू झाली, व त्याचे रूपांतर अन्यायकारक वसुलीत होवुन अडवणुक करणे. शेतकऱ्यांनी विरोध केल्यास ऊस न तोडणे, तोड अर्धवट टाकून जाणे, खंडणीची रक्कम वाढवणे, शेतकऱ्याची कोंडी करणे. असे जुलूम केले जात आहेत. याविषयी किसान संघाने अनेक वेळा निवेदने, आंदोलने केली आहेत. नुकतेच 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व कारखान्यांना, तहसिलदार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. तसेच मा. साखर आयुक्त यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती. या अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज याला यश प्राप्त झाले आहे. मा.साखर आयुक्तांनी याबाबतीत पुढाकार घेऊन एक आदेश पारित केला आहे. त्यानुसार सर्व कारखाने यांच्याकडे तक्रार निवारण अधिकारी यांची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रथमतः त्या स्तरावर शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करावी, तिथे दाद न लागल्यास याबाबत शेतकऱ्याने shetakari.madat@gmail.com या मेल आयडीवर मा. साखर आयुक्तांना मेल करावा त्यामध्ये वाहतूकदार याचे नाव वाहन क्रमांक व वसूल केल्याची रक्कम यांचे माहिती द्यावी. आयुक्तालय या मार्फत याची चौकशी होऊन वाहतूकदाराच्या पेमेंट मधून सदर रक्कम वसूल करून शेतकऱ्याला देण्याची हमी दिली आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्यावर असा अन्याय झाला तर या सुविधेचा लाभ घ्यावा. आवश्यक तर भारतीय किसान संघाकडे संपर्क साधावा. किसान संघाने या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर माननीय साखर आयुक्तांनी जो सकारात्मक प्रतिसाद दिला व शेतकऱ्यांचे रक्षण करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल भारतीय किसान संघ त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करत आहे.
