Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

‘ओवाळीते भाऊराया’ मैफलीतून उलगडले भावा-बहिणीचे रेशीम नाते !

पुणेःसंत परंपरेतील थोर संतांपासून ते गदिमांपर्यंत अनेकांनी भाऊ-बहिणीचे अनोखे आणि रेशीम नाते उलगडणाऱ्या रचनांचा पुणेकर रसिकांनी आज पुन्हा एकदा आनंद घेतला. निमित्त होते भाऊबीजे निमित्त एमएनजीएल तर्फे आज आयोजित ‘ओवाळीते भाऊराया’ मैफलीचे.

करोना काळानंतर मुक्तपणे साजरी होणारी यंदाची दिवाळी महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड ( MNGL ) तर्फे आयोजित ‘ओवाळीते भाऊराया’ या गीत संगीताच्या सुरेल मैफलमुळे पुणेकर रसिकांसाठी संस्मरणीय ठरली.

बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर एमएनजीएलचे डायरेक्टर दीपक सावंत, भारतीय जनता पक्षाचे संघठन सरचिटणीस आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे, एमएनजीलएलचे कमर्शियल डायरेक्टर संजय शर्मा, संवाद पुणेचे सुनील महाजन आणि निकिता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.

रसिकांसाठी मोफत असलेल्या या मैफलीत पुण्याच्या संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक विश्वात मोलाची भर घालणारे अमेय जोग, दिपीका जोग, मनिषा निश्चिल( कान्हेगावकर ), मनोज कान्हेगावकर, अभिनेत्री आणि नृत्यांदना नुपुर दैठणकर, संतुर वादक निनाद दैठणकर हे भाऊ बहीण सहभागी झाले होते.
यावेळी मनिषा निश्चिल( कान्हेगावकर ), मनोज कान्हेगावकर या बहिण भावांनी सादर केलेल्या ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या सदाबहार गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. नंतर ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ‘फुलों का तारों का सबका कहेना है’ हे गीत तसेच गदिमा यांनी लिहिलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले भावा-बहिणीतील खट्याळ नाते सांगणारे ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ ही गीते अमेय जोग आणि दिपीका जोग यांनी सादर केली. मनोज कान्हेगावकर यांनी ‘माझे माहेर पंढरी’ ही अभंग रचना सादर केली.
अभिनेत्री आणि नृत्यांदना नुपुर दैठणकर, संतुर वादक निनाद दैठणकर यांनी कलासंगम या संकल्पेअंतर्गत भरतनाट्यम आणि संतूरची जुगलबंदी सादर केली. त्यानंतर गणपती स्तुती आणि अष्टरस सादर केला. निनाद दैठणकर यांनी पावसावर आधारित ‘रेन ड्रॉप्स’चे सादरीकरण करून वेगळीच अनुभुती दिली. देठणकर बंधू-भगिनींनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सादर केलेल्या ‘सारे जहंसे अच्छा’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता केली.
या कलाकारांना तबल्यावर विशाल गंडब्रवार, वेस्टर्न ड्रमवर अभय इंगळे, हार्मोनियमवर प्रसन्न बाम, किबोर्डवर यश भंडारे यांनी साथसंगत केली.

यावेळी मनोगतात एमएनजीएलचे डायरेक्टर दीपक सावंत म्हणाले , अंधकारापा प्रकाशाचा विजय म्हणजे दिवाळी सण आहे. एमएनजीएलच्या माध्यमातून घराघरांत गॅस पोहचवून तसेच पीएमटी आणि रिक्षांना पर्यावरण पूरक सीएनजीचा पुरवठा करून निसर्ग संवर्धनाच्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत.

भारतीय जनता पक्षाचे संघठन सरचिटणीस आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी मनोगतात एमएनजीएलच्या प्रगतीवर प्रकाश टाकत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे आणि संगीत मैफलीचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading